खाकी वर्दीतले दोन पोलीस रस्त्यातच भिडले, VIDEO व्हायरल; नेमकं कशावरुन झाला वाद?

बिहार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोहसराय रेल्वे थांब्याजवळ ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही मारहाण झाली आहे. आधी धक्काबुक्की आणि नंतर लाथा-बुक्क्या आणि काठीने दोघांनी एकमेकांवर हल्ला केला आहे. 

    कायदा सुव्यस्था राखण्याचं काम करणारे पोलीस भररस्त्यात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिहार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ आहे. सोहसराय रेल्वे थांब्याजवळ ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही मारहाण झाली आहे. आधी धक्काबुक्की आणि नंतर लाथा-बुक्क्या आणि काठीने दोघांनी एकमेकांवर हल्ला केला आहे.

    नेमकं काय घडलं? 

    मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई झाली आहे. व्हिडीओमध्ये एक पोलीस दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. अवैध पैसे वसुलीच्या कारणावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

    व्हिडीओमध्ये दिसत आहे त्यानुसार, आधी दोन्ही पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर हात उचलण्यास सुरुवात केली. यानंतर एका पोलिसाने गाडीतून काठी काढली आणि दुसऱ्या पोलिसाने झाडावरून काठी तोडली. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

    दोन्ही पोलिस कर्मचारी निलंबित

    व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, दोन्ही पोलिसांच्या कृत्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई करण्यात येणार आहे.