मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला; 17 मजुरांचा मृत्यू, 30 ते 40 मजूर अडकले ढिगाऱ्याखाली

मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणधीन रेल्वे पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

    एकीकडे देशाचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न साकार होत आहे. संपूर्ण देशात उत्साहाच, जल्लोषात वातावरण असताना दुसरीकडे देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिझोरममध्ये रेल्वे पूल कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. (Mizoram Railway Bridge Collapse) मिझोरामची (Mizoram News) राजधानी ऐझॉलजवळ (Aizawl) निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला. या दुर्घटनेत 17 मजुरांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली 30 ते 40 मजूर अडकल्याचं सांगितलं जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

    कुठे घडली दुर्घटना

    मिझोरामच्या ऐझॉलजवळ एक रेल्वे ओव्हरचं काम सुरू आहे. कुरुंग नदीवर बैराबी ते सायरंग जोडणारा हा रेल्वे पुल आहे. या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे 40 ते 50 मजूर काम करत होते. यावेळी ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दुर्घटनास्थळी अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी शोक केला व्यक्त

    मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थनाही केली आहे.