उप्रत काँग्रेसची गाय बचाओ यात्रा; प्रदेशाध्यक्षांसह १५० कार्यकर्त्यांना अटक

प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू या यात्रेत डोक्यावर मातीच्या मडक्यात गायीचे अवशेष घेऊन सहभागी झाले. तथापि त्यांना पोलिसांनी मार्गातच रोखून धरले.

लखनौ. ‘गाय बचाओ- किसान बचाओ’ पदयात्रा काढण्यास अडून बसलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना शनिवारी पोलिसांनी ललितपूर जिल्ह्यातील दैलवारा गावातून सुमारे दीडशे कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. एकीकडे अस्तित्व आणि नेतृत्व संकटाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे ही यात्रा काढली. प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू या यात्रेत डोक्यावर मातीच्या मडक्यात गायीचे अवशेष घेऊन सहभागी झाले. तथापि त्यांना पोलिसांनी मार्गातच रोखून धरले. दरम्यान या यात्रेपूर्वी पोलिसांनी झाशीत माजी मंत्री प्रदीप जैनसह डझनभर नेत्यांना अटक केली.

पोलिसांनी केला बळाचा वापर
काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांवर बळाचा वापर केल्याचा आरोप केला. या घटनेत जिल्हाध्यक्षांसह जवळपास दोन डझन कार्यकर्ते जखमी झाले असून पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. दरम्यान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बलवंतसिंह राजपूत यांनी गायीच्या नावावर सत्तेत आलेल्या भाजपाला गायीची काळजी नाही आणि शेतकऱ्यांवरही कृपादृष्टी करीत नाही अशी टीका केली. सौजना आणि अमझरा येथील गोशाळेतील गायी मृत होताहेत आणि पक्षी त्यांचा फडशा पाडत आहे असा आरोप त्यांनी केला.

यात्रेला परवानगी नव्हती
दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक बृजेशकुमार सिंह यांनी या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती त्यामुळे अजयकुमार लल्लू, जिल्हाध्यक्ष बलवंतसिंह राजपूत यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली.