उपराष्ट्रपदासाठी उद्या होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

उद्या उपराष्ट्रपदाची निवडणूक होणार आहे. यामध्ये एनडीएकडून जगदीप धनखड तर यूपीएकडून मार्गारेट अल्वा उभ्या आहेत. त्यामुळे यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊन १५ दिवस झाले आहे. आता देशात उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीचे (Vice President)  वारे वाहू लागले आहेत. उद्या उपराष्ट्रपदाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून यामध्ये एनडीएकडून जगदीप धनखड तर यूपीएकडून मार्गारेट अल्वा उभ्या आहेत. त्यामुळे यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर बहुजन समाज पार्टीने एनडीएला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. उद्याच उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. म्हणजे देशाला उद्याच नवा उपराष्ट्रपती मिळणार असल्याने जगदीप धनखड उपराष्ट्रपती होणार की मार्गारेट अल्वा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    उमेदरावारांची पार्श्वभूमी

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही नेत्यांचा राजकीय ग्राफ जवळजवळ सारखा आहे. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाल होत्या. दोघेही माजी मंत्री आहेत. दोघेही पेशाने वकील आहेत. त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ नेत्यांपैकी कोण उपराष्ट्रपती होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.