विनोद तावडेंवर हिमाचल प्रदेश निवडणुकीची जबाबदारी; निकालापूर्वीच भाजपच्या हालचाली

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशामध्ये जाण्यास सांगितले आहे. त्यानुसार, तावडे मंगळवारी शिमला येथे रवाना झाले आहेत. तावडे यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.

    शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Pradesh Election) निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) अटीतटीचा सामना रंगला आहे. बहुमताचा आकडा पार करता आला नाही तर, भाजपला सत्तेसाठी कसरत करावी लागणार आहे. हिमाचल प्रदेशमधील निकालानंतर उद्भवणारी संभाव्य राजकीय परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर दिली आहे.

    भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशामध्ये जाण्यास सांगितले आहे. त्यानुसार, तावडे मंगळवारी शिमला येथे रवाना झाले आहेत. तावडे यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jayram Thakur), केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये आता मतमोजणी असून चित्र दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

    हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागा असून यंदा विधानसभेची निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता कमी आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. बहुमतासाठी ३५ जागांचा आकडा पार करण्याचा आत्मविश्वास दोन्ही पक्षांना असला तरी कोणातरी एका पक्षाला सोबत घ्यावे लागणार आहे. या अनिश्चिततेमुळे हिमाचल प्रदेशमधील राजकीय परिस्थिती अस्थिर बनली असून सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.