चंद्रावर प्रज्ञान रोव्हर नेमकं काय करतेय; इस्रोने महत्त्वाच्या माहितीसह व्हिडीओ केला शेअर, वाचा सविस्तर

    Pragyan Rover on Moon : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोने आता चंद्रावरील पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवले आहे. त्यातील डेटा सिस्टीमद्वारे चंद्रावरील भूपृष्ठाचा अभ्यास केला जाणार आहे. जेणेकरून भविष्यात माणूस चंद्रावर वास्तव्य करू शकतो का, यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे. आता इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर नेमकं काय करते हे दिसणार आहे.

    अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इस्रोने राबवली मोहीम

    अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. चंद्रावर पाणी किंवा बर्फ आहे की नाही, तिथे कोणते खनिजे आहेत? भविष्यात माणूस चंद्रावर वास्तव्य करू शकतो का, त्यासाठी तिथे पोषक असे वातावरण आहे की नाही, किंवा ते निर्माण करता येईल का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इस्रोने ही मोहीम राबवली आहे.

    १४ दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार

    या मोहिमेअंतर्गत १४ दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. यातून शास्त्रज्ञांना चंद्रावरील विविध गोष्टींचा शोध लावण्यास मदत होईल. तसेच, अनेक रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होण्याचीदेखील शक्यता आहे. मात्र, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर नेमकं काय करीत आहे, याबद्दल आता स्वतः इस्रोने माहिती दिली आहे.

    इस्रोने ट्वीट करीत दिली माहिती

    इस्रोने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये इस्त्रोने प्रज्ञान रोव्हरचा एक नवीन व्हिडीओही जोडला आहे आणि म्हटले आहे की, प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत आहे.