भाजपाशी तीन दशकं वैर असलेल्या मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण, काय आहे याचा राजकीय अर्थ?

समाजवादी पार्टीचे संस्थापक , उ. प्रदेशात (Uttar Pradesh) मोठा जनाधार असलेले नेते मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आलीय.

  नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे संस्थापक , उ. प्रदेशात (Uttar Pradesh) मोठा जनाधार असलेले नेते मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आलीय. गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला दीर्घ आजारानं मुलायमसिंहांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी उ. प्रदेशातून करण्यात आली होती. पद्म पुरस्कारांत मुालायमसिंह यांना पद्मविभूषण देण्यात येईल, याची कल्पना मात्र कोणालाच नव्हती. मुलायमसिंह यादव यांना इतक्या लवकर मरणोत्तर पद्मविभूषण घोषित करण्याचे राजकीय अर्थही आहेत.

  उ. प्रदेशच्या राजकारणातील अर्थ 

  गेल्या काही वर्षांत उ. प्रदेशात ओबीसींमध्ये भाजपानं चांगले बंधान बांधले आहे. मात्र अजूनही मागासलेल्या जातीतील यादव या प्रभावशाली जातीत अद्याप भाजपाला अपेक्षित जम बसवता आलेला नाही. हीच यादव मतं समाजवादी पार्टीकडून भाजपाच्या बाजूला झुकावीत यासाठी हा पद्मविभूषण दिला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सपाचा सर्वाधिक विश्वासू मतदार त्यांच्याकडून भाजपाच्या दिशेनं खेचण्याचा हा प्रयत्न मानण्यात येतोय. मुलायमसिंह यांचं व्यक्तिमत्व हे राजकारणाच्या दशांगुळी वर असलं तरी भाजपानं खेळलेली ही चाल नक्कीच यादव मतांसाठी आणि मुलायमसिंह समर्थकांना आमिष दाखवण्यासाठी आहे, असं मानण्यात येतंय.

  मुलायम यांच्या निधनानंतरही प्रभाव कायम 

  भाजपानं लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. जे पी नड्डा यांनी उ. प्रदेशात लक्ष घातले असून, 14 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. त्यातील एक लोकसभा मतदारसंघ मुलायमसिंह यादव यांच्या नावानं ओळखला जातो तो म्हणजे मैनपुरी. मुलायमसिंहांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीत अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा विजय झाला होता. भाजपासाठी ही जागा आता महत्त्वाची मानण्यात येतेय.

  उ. प्रदेशाचं देशाच्या राजकारणातलं महत्त्व 

  लोकसभेतल्या 543 जागांपैकी 80 जागा या उ. प्रदेशातून येतात. त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघआतून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. उ. प्रदेशातून लोकसभेचा आणि सत्तेचा मार्ग प्रशस्त होतो, असं नेहमीच सांगण्यात येतंय. भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकांत उ. प्रदेशात मिळालेल्या बंपर विजयामुळंच मोदी सत्तेत येऊ शकले होते. 2019 ला भाजपाला काही जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यातील काही जागांवर मुलायमसिंह यांचे खंदे समर्थक आहेत. सपाच्या पारंपरिक मतदाराच्या मनात भाजपाबद्दल सहानभूती मिळवण्याचा हा पद्मविभूषण हा एक मार्ग असल्याची चर्चा आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षाभंग झालेल्यांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा मानण्यात येतोय.

  मुलायमसिंह आणि भाजपाचं बदलतं नातं 

  याच मुलायमसिंहांनी 1990 साली अयोध्येत कारसेवकांना रोखण्यासाठी गोळाबीराचे आदेश दिले होते. त्यात अनेक कारसेवकांचे प्राण गेले. मुलायम यांना रावणाची उपमा त्यावेळी भाजपानं दिली होती. उ. प्रदेशात सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या मुयायम यांनाच भाजपानं मरणोत्तर पद्मविभूषणानं सन्मानित करुन, सगळ्यांनाच आश्चर्यचकित केल्याचं मानण्यात येतंय. 2014 च्या विजयानंतर मात्र भाजपाच्या नव्या राजकारणातील प्रयोगात मुलायम यांच्याशी भाजपानं जवळीक निर्माण केली. पंतप्रधानांच्या शपथ ग्रहम सोहळ्यात मुलायम यांना हाताशी धरुन त्यांना पहिल्या रांगेत स्थान देणारे अमित शाहा, हा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. 2017 साली भाजापनं बहुमत मिळवल्यानंतर, योगींच्या शपथविदी कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि मुलायम यांच्यातील कान गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. 2019 लोकसभा निव़डणुकांच्या आधी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात मुलायम यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून येण्यासाठी दिलेला आशीर्वादही अनेकांच्या स्मरणात आहे. आता मुलायमसिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन भाजपानं उ. प्रदेशच्या राजकारणात नवा षटकार मारल्याचं सांगण्यात येतंय.