कोण होणार उपराष्ट्रपती? मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड?

उपराष्ट्रपती पदासाठी संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत.

  नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक (Vice President Election) होत आहे. या निवडणुकीचे निकाल सायंकाळपर्यंत जाहीर होणार असून निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार तथा पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्यात लढत होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे.

  उपराष्ट्रपती पदासाठी संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत.

  एकल हस्तांतरणीय मताद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार, निवडणूक घेतली जाईल आणि निवडणूक गुप्त मतपत्रिकेद्वारे होईल. या प्रणालीमध्ये, मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर प्राधान्य चिन्हांकित करावे लागणार आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे.

  संसदेचे सध्याचे संख्याबळ ७८८ आहे, जिंकण्यासाठी ३९० पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. लोकसभेत भाजपचे एकूण ३०३ असून खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नाहीत. लोकसभेत एनडीएचे एकूण ३३६ सदस्य आहेत. तसेच, राज्यसभेत भाजपचे ९१ सदस्य आहेत आणि एनडीएचे एकूण १०९ सदस्य आहेत. सर्व मिळून एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण ४४५ सदस्य आहेत.

  एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना वायएलआरसीपी (YSRCP), बीएसपी (BSP), टीडीपी (TDP), बीजेडी (BJD), एआयएडीएमके (AIADMK), शिवसेना (Shivsena) इत्यादी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

  जगदीप धनखड हे ७१ वर्षांचे असून ते राजस्थानमधील जाट समाजातील आहेत. त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात.

  मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तेलंगना राष्ट्र समिती (TRS), आम आदमी पार्टी (AAP) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांनी अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननेही (एआयएमआयएम) अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.