पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी लसीकरणाचा विश्वविक्रम

शुक्रवारी झालेल्या लसीकरणाच्या वर्ल्ड रेकॉर्डनुसार, किती गतीने काल दिवसभरात लसी देण्यात आल्या, याचा अंदाज येवू शकेल. शुक्रवारी दुपारपर्यंतच देशाने दीड कोटींच्या लसीरणाचा टप्पा ओलांडला होता. दिवसभरात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण याचा अर्थ प्रत्येक तासाला १७ लाख, प्रत्येक मिनिटाला २८ हजार तर प्रत्येक सेंकदाला ४४४ जणांचे लसीकरण देशभरात करण्यात आले.

  नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशानं लसीकरणाचा नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात अडीच कोटींहून अधिक देशवासियांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. कोविन पोर्टलवरील माहितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत २ कोटी ५० लाख १० हजार ३९० डोस देण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यावर प्र्तिक्रिया देताना, जगात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात अद्यापपर्यंत कधीही लसीकरण झाले नसल्याचे सांगितले आहे.

  शुक्रवारी झालेल्या लसीकरणाच्या वर्ल्ड रेकॉर्डनुसार, किती गतीने काल दिवसभरात लसी देण्यात आल्या, याचा अंदाज येवू शकेल. शुक्रवारी दुपारपर्यंतच देशाने दीड कोटींच्या लसीरणाचा टप्पा ओलांडला होता. दिवसभरात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण याचा अर्थ प्रत्येक तासाला १७ लाख, प्रत्येक मिनिटाला २८ हजार तर प्रत्येक सेंकदाला ४४४ जणांचे लसीकरण देशभरात करण्यात आले.

  राज्यांचा विचार केला तर एकट्या कर्नाटक राज्यात शुक्रवारी दिवलसभरात २६ लाख ९३ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर उशिरा कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी या गतीसाठी  आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.

  राज्यांना ७७.७७ कोटींपेक्षा जास्त लसी पुरवण्यात आल्या आहेत.

  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आत्तापर्यंत ७७.७७ कोटीहून अधिक लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ६.१७ कोटी लशींचे डोस शिल्लक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

  शुक्रवारी अडीच कोटी नागरिकांच्या लसीकरणापूर्वी तीन वेळा एका कोटीहून अधिक लसीकरण का दिवसात झाले होते. २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणमि ६ सप्टेंबर या तिन्ही दिवशी एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरण कार्यक्रमाला अशीच गती मिळायला हवी अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.