राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा आज अर्ज दाखल करणार, राहुल गांधी, शरद पवारांसह ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता

विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज दुपारी 12.15  वाजता सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी, (Rahul Gandhi) मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, शरद पवार (Sharad Pawar) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते येण्याची शक्यता आहे.

    आपल्याला इतर काही पक्षांचाही पाठिंबा मिळेल, असा दावा सिन्हा यांनी केला. यशवंत सिन्हा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आमची लोकशाही, आमचे संविधान धोक्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्याची सर्व मूल्ये धोक्यात आहेत. त्यामुळे भारताला धोका आहे.यावेळी ते म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे ते डोळे उघडणारे आहे. हवाला प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या चौकशीचा संदर्भ देत सिन्हा म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात टिकले नाही. ही सर्व प्रकरणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.