तरुणींना बाईकवर बसवून स्टंट करणं पडलं महागात, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई

दोन तरुणींसोबत बाईकवर थरारक स्टंट करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बाईक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षांच्या तरुणाला अटक केली.

मुंबई : दोन तरुणींसोबत बाईकवर थरारक स्टंट करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बाईक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षांच्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान आरोपीने दोन मुलींसह त्याच्या दुचाकीवर थरारक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांनी फैयाज कादरी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तो दोन तरुणींसोबत बाईकवर स्टंट करत होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करून त्याला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं.