यूट्यूबरने अयोध्येत बांधले योगींचे मंदिर, नियमित होते पूजा

प्रभाकर यूट्यूबर आहेत. त्यांनी योगींच्या समर्थनार्थ आतापर्यंत ५०० हून अधिक गाणी गायली आहेत. योगींची मूर्ती राजस्थानातून खास ऑर्डर देऊन मागवण्यात आली आहे. प्रभाकर यांच्या मते, योगी राम व कृष्णाचे अवतार आहेत.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील भरतकुंडलगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. मौर्याच्या पुरवा गावचे प्रभाकर मौर्य (३२) यांनी तब्बल ८.५६ लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधले आहे. त्यात योगींना राम अवतारात दाखवण्यात आले आहे. मूर्तीच्या हातात धनुष्य बाण आहे. येथे दररोज सकाळ – सायंकाळ पूजा व आरती होते.

    प्रभाकर यूट्यूबर आहेत. त्यांनी योगींच्या समर्थनार्थ आतापर्यंत ५०० हून अधिक गाणी गायली आहेत. योगींची मूर्ती राजस्थानातून खास ऑर्डर देऊन मागवण्यात आली आहे. प्रभाकर यांच्या मते, योगी राम व कृष्णाचे अवतार आहेत. त्यामुळे ते सनातन धर्माचा प्रचार करत आहेत. प्रभाकर यांच्यासाठी ते देवाहून कमी नाहीत.

    प्रभाकर यांनी सांगितले की, त्यांचे यूट्यूबवर १ लाख २५ हजार फॉलोअर्स आहेत. त्यावर ५०० व्हिडिओ अपलोड झालेत. चॅनेलमधून मिळणाऱ्या पैशांतूनच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. शेतात बांधण्यात आलेल्या या मंदिरावर आतापर्यंत ८ लाख ५६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.

    मंदिर बांधताना गावातील काही लोकांनी विरोध केला. पण वडील जगन्नाथ मोर्या यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. प्रभाकर मौर्यांना ४ भावंड असून, ते तिसऱ्या क्रमांकाचे आहेत. त्यांना २ बहिणीही आहेत. वडील शेती करतात.