youtubers village

तुलसी गावामध्ये एकूण 432 कुटुंब वास्तव्याला असून या गावाची लोकसंख्या 3000 ते 4000 आहे. जय आणि ज्ञानेंद्र या दोन मित्रांना व्हिडिओ तयार करताना पाहून गावातील इतर लोकांनीही स्वत:चे यूट्यूब चॅनल तयार करायला सुरुवात केली.

छत्तीसगड: नोकरी आणि धंद्याच्या शोधात सगळेच जण असतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईचा भर कंटेंट क्रिएशन करण्याकडे वळल्याचे पाहायला मिळते. पूर्वी करमणूकीसाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यूट्यूबचा (Youtube) वापर सध्या रोजगार मिळवण्यासाठी केला जात आहे. भारतात (India) एक असं गाव आहे ज्याला यूट्युबर्सचं गाव(Youtubers Village) अशी ओळख मिळाली आहे.

डिजिटल क्रांतीमुळे आजकाल प्रत्येकाच्या हातात चांगलं नेटवर्क असलेले मोबाईल असतात. पुढे कोरोना काळामध्ये अनेक लोक मजा म्हणून व्हिडिओ बनवायला लागले. त्यामुळे यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्सची संख्या खूप वाढली. यूट्यूबर्सकडून प्रेरणा घेऊन छत्तीसगढ राज्यातील तुलसी गावामध्ये राहणाऱ्या जय आणि ज्ञानेंद्र या दोन मित्रांनी 2016 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली. गमतीशीर व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर शेअर करु लागले. पुढे मग त्यांचे मित्र त्यांना व्हिडिओ बनवायला मदत करु लागले. हळुहळू गावातील लहान मुले आणि वयस्कर मंडळीसुद्धा युट्यूब व्हिडिओ बनवण्यात दंग झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुलसी गावामध्ये एकूण 432 कुटुंब वास्तव्याला असून या गावाची लोकसंख्या 3000 ते 4000 आहे. जय आणि ज्ञानेंद्र या दोन मित्रांना व्हिडिओ तयार करताना पाहून गावातील इतर लोकांनीही स्वत:चे यूट्यूब चॅनल तयार करायला सुरुवात केली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण छत्तीसगडच्या या गावामध्ये तब्बल 40 ते 50 यूट्यूब चॅनल्स आहेत. आज या गावामध्ये 1000 पेक्षा जास्त लोक यूट्यूबवर व्हिडीओ बनवून पैसे मिळवत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 5 वर्षांच्या लहान मुलांपासून 80 वर्षांच्या वृद्धांचाही समावेश आहे. त्यामुळेच लोक याला यूट्यूबर्सचे गाव म्हणतात.

सुरुवातीच्या काळामध्ये या गावातील गावकरी साध्या फोनचा वापर करुन यूट्युबसाठी व्हिडीओ तयार करत असत. मात्र आता ते व्हिडिओ तयार करताना अत्याधुनिक असा कॅमेरा वापरतात. व्हिडिओ एडिटिंगसाठीही ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतात. विशेष म्हणजे गावातील बहुसंख्य लोकांचं यूट्यूब चॅनलद्वारे पैसे कमावणे हेच काम आहे. यूट्यूब हे त्यांच्या रोजगाराच्या प्रमुख साधनांपैकी एक बनलं आहे. भारतातल्या डिजिटल क्रांतीचं प्रतीक म्हणावं, असंच हे गाव आहे.