ratan tata

वायएसआर काँग्रेसचे (YSR Congress) खासदार रघु रामकृष्ण राजू (Raghu Ramkrishna Raju) यांनी रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.

    उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा ८५ वा बुधवारी वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशातच वायएसआर काँग्रेसचे (YSR Congress) खासदार रघु रामकृष्ण राजू (Raghu Ramkrishna Raju) यांनी रतन टाटा यांना भारतरत्न (Bharat Ratna) द्यावा, अशी मागणी केली आहे. रघु रामकृष्ण राजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Letter To President Draupadi Murmu) यांना पत्र दिलं आहे.

    या पत्रामध्ये ते म्हणतात की,“अनेक अब्जाधीश या पृथ्वीवर जन्माला येतील, पण ज्यांनी लोकांवर कायमस्वरुपी एक छाप सोडली आहे ते रतन टाटा यांच्यासारखे लोक आहेत. रतत टाटा एक महान व्यक्ती असून, ते भारतरत्नसाठी पात्र आहेत.” देशातील परोपकारी अब्जाधीशांच्या यादीत रतन टाटांचा कायम उल्लेख असेल असेही या पत्रात सांगण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू यांनी रतन टाटांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्यास सांगितलं आहे.

    याआधी ऑक्टोबरमध्ये, रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या सेवा भारतीने ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. रतन टाटा यांच्यासह इतर २५ मान्यवर आणि संस्थांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलं. रतन टाटा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.