parliament

खरेतर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात(Freedom Struggle) आणि काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात देशाचे नेतृत्व मराठी नेत्यांनीच केले. पण ब्रिटिशांशी कडवी झुंज दिल्या नंतरच्या पंचाहत्तर वर्षात मात्र मराठी नेते तिथपर्यंत पोचले नाहीत. सर्वोच्च नेतृत्वाच्या त्या शर्यतीतही खऱ्या अर्थाने आपले मराठी नेते दिसले नाहीत.

    “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!”(Maharashtra) पोवाड्यातील या ओळी आपल्या अंगावर नक्कीच रोमांच उभे करतात. पेशवाईच्या चढत्या वाढत्या काळात पानीपतच्या लढाया, त्यानंतरचे देशातील राजकारण( Marathi People Influence In Indian Politics) यात मराठ्यांचा प्रभाव मोठा होता. (Independence Day 2021)दिल्लीत कोणाला गादीवर बसवायचे याचे स्वातंत्र्य आणि सत्ता, इतिहासात काही काळ मराठ्यांकडे नक्कीच होती. पण दिल्लीतील बादशहाला बाजूला सारून आपणच सत्ता हातात घ्यावी हे मराठ्यांना त्या काळात कधी करता आले नाही. संधी नव्हती असे नाही. पण नाही करता आले. पण मराठी माणसाच्या मनात असणारे ते एक शल्य मात्र नक्कीच कायम राहणारे आहे की, “आमच्यापैकी कुणी देशावर राज्य का बरे करू शकले नाही ?”. तेच ऐतिहासिक शल्य किंवा ती एक आस आजही आपल्या सर्वांच्या मनात जागीच असते की “आमच्यापैकी कुणी मराठी माणूस दिल्लीत सत्ताधीश का बरे बनलेला नाही ?”

    अद्याप कोणीही मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर, पंतप्रधानपदावर, आरूढ झालेला नाही, हे गेल्या पाऊणशे वर्षांच्या स्वातंत्र्यात दिसून आले आहे. खरेतर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात देशाचे नेतृत्व मराठी नेत्यांनीच केले. पण ब्रिटिशांशी कडवी झुंज दिल्या नंतरच्या पंचाहत्तर वर्षात मात्र मराठी नेते तिथपर्यंत पोचले नाहीत. सर्वोच्च नेतृत्वाच्या त्या शर्यतीतही खऱ्या अर्थाने आपले मराठी नेते दिसले नाहीत.

    या सरत्या काळात दिल्लीचे राजकारण, असंख्य मराठी नेत्यांनी आपापल्या दशकांत, गाजवले आहे. देशात राजशिष्ठाचाराच्या यादीतील पहिल्या पाच पदांपैकी चारांवर मराठी नेते दिसले आहेत फक्त पंतप्रधान पदावर नाही ! राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, उपपंतप्रधान अशी ही राजशिष्टाचाराची यादी पुढे पुढे जाते.

    लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळंकरांना आपण मराठी नेते म्हणू शकतो. त्यांच्या कुटंबाची मुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात होती. त्यांचे प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले. पण नंतर कुटुंब अहमदाबादेत गेले व तिथेच तरूण दादासाहेब मावळंकर हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. लोकसभेच्या अनेक प्रथा व परंपरांची सुरुवात दादासाहेबांच्याच निर्णयातून झालेली आहे. पण कार्यगत आयुष्यात ते अहमदाबादीच राहिले व तिथेच निवर्तले. पण होते ते मराठीच !

    दादासाहेबांच्या पासून ते मनोहर जोशींपर्यंत मध्ये शिवराज पाटील चाकूरकरही आलेच, लोकसभेचे अध्यक्षपद मराठी नेत्यांनी गाजवले. प्रतिभा पाटील यांना देशातील पहिली महिला राष्ट्रपती महोदय हा मोठाच ऐतिहासिक बहुमान मिळाला. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, वसंतराव साठे अशा मराठी नेत्यांनी दिल्लीत विविध केंद्रीय मंत्रीपदे गाजवली. पण राजकीय सर्वोच्च शक्तीच्या पंतप्रधानपदाने मात्र मराठीपणाला हुलकावणी दिलेली आहे.

    नाही म्हणायला पी. व्ही. नरसिंह राव यांच्या रूपाने एका महाराष्ट्राच्या माजी खासदारांना पंतप्रधानपद लाभले. पण त्यांनी स्वतःला महाराष्ट्राचे नाही, तर आंध्राचे पहिले पंतप्रधान मानण्यातच धन्यता मानली. खरेतर आंध्रातून लोकसभेवर जाणे त्यांना काँग्रेस नेता या नात्याने शक्य नव्हते. तेव्हा विदर्भातील जनेतने त्यांना आपले मानले. आपल्या नागपूरच्या रामटेकचे ते खासदार राहिले आहेत आणि ते उत्तम मराठी बोलत असत. त्यांच्या सोबत राम खांडेकर हे विशेष कार्यकारी अधिकारी आपल्या मंत्रालयातील मूळचे होते. त्यांनी आधी यशवंतरावांचे स्वीय सहाय्यक म्हणून दिल्ली पाहिली व मग तिथेच रमले. अनेक मोठ्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. ते रावसाहेबांच्याही विश्वासातील होते आणि पंतप्रधानपदाच्या त्यांच्या कार्यकाळात दिल्लीतील मराठी आवाज खांडेकर होते.

    दिल्लीच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा कारभार हा समिती पद्धतीत चालतो. त्यातील मंत्रीमंडळाची राजकीय व्यवहार विषयक तसेच संरक्षण विषयक अशा ज्या दोन महत्वाच्या समित्या असतात. त्यात एके काळी मराठी नेत्यांचा मोठा दबदबा होता.
    ( कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी आणि कबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स ) कारण अर्थ, परराष्ट्र, संरक्षण आणि गृहे ही खाती संभाळणारे नेते या मंत्रीमंडळ समित्यांवर प्रामुख्याने पंतप्रधानांच्या सोबत काम करतात. आणि त्या मंत्रीपदांवरच अनेक वेळा मराठी नेते चमकलेले आहेत.

    रावसाहेब पंतप्रधान होते तेव्हा पवारसाहेब संरक्षण मंत्री होते आणि शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते. हे तिघेच राजकीय व्यववहार समितीचे प्रमुख सदस्य होते. ते सारेच मराठीत बोलत असल्यामुळे बाबरी मशीद पडली, त्या कालखंडात या समितीच्या चर्चा मराठीत झाल्याचा किस्सा स्वतः शरद पवार सांगत असत. अर्थातच समितीच्या नोंदी या इंग्रजी व हिंदीतच होत असतात, हा भाग अलाहिदा. पण मराठीचा ठसा दिल्लीच्या राजकीय जीवनावर सुरवातीपासूनच उमटत राहिला आहे, हे म्हणावेच लागेल.

    यशवंतराव चव्हाण यांना स्वतः पं. नेहरूंनी दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून निमंत्रित केले तो मराठी माणसाच्या भावना उचंबळून आणणारा क्षण होता. आपल्या सर्वांच्या डोळ्यांपुढे दिल्लीतील मराठी राज्याची स्वप्ने तरू लागली होती. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे कौतुक साक्षात आचार्य अत्र्यांनी केले होते. आणि ते आपल्या सर्वांना आजही मान्यच आहे. पण पुढे या सह्याद्रीने काय केले ? काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात चव्हाणसाहेबांचे स्थान व मान मोठा होता. ते आणि बाबु जगजीवनराम हे दोन बुहजन नेते इंदिरा गांधींच्या सोबत राहिले. सिंडिकेट आणि इंडिकेटच्या ७० च्या दशकात चव्हाण साहेब काय भूमिका घेतात याकडे देशाचे लक्ष होते. पण त्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले. पक्ष फोडता कामा नये असे त्यांचे मत असल्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींना निर्णायक क्षणी साथ दिली.

    मोरारजी देसाई हे फुटीर काँग्रेसचे नेतृत्व करू लागले आणि आणीबणी नंतर जेव्हा जनता पक्षाची ऐतिहासिक लाट उठली, तेव्हा मोरारजी देसाई यांच्या रूपाने पहिल्या गुजराथी नेत्याने पंतप्रधानपदावर हक्क सांगितला. तो जनता पक्षाने मान्य केला. जर तिथे चव्हाण साहेब असते तर ? संधी नक्कीच दिसली होती. पण इतिहासाची पावले निराळी पडली होती. चव्हाणसाहेबांच्या या मध्यममार्गी भूमिकेवर विख्यात व्यंगचित्रकार लक्ष्मण यांनी कुंपणावर बसलेल्या नेत्याचे चित्र रेखाटले व ती ओळख चव्हाण साहेबांना चिकटली. वस्तुतः अत्यंत विचारी, उभ्यासू आणि प्रशसनात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असणारे हे नेतृत्व सर्वोच्च संधी पासून मुकले.

    पुढे तीस एक वर्षांनी पुन्हा तसाच योग आला. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत चला असा आग्रह पंतप्रधानांनी केला. आणि याही वेळी देण्यात आलेले खाते होते संरक्षणच ! पंतप्रधान रावसाहेबांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून शरद पवारांना दिल्लीत निमंत्रित केले. पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. पण तिथे जम बसण्याच्या आधीच पवार साहेबांना, राव साहेबांनीच परत मुंबईत मुख्यमंत्री म्हणून पाठवले. बाबरीनंतरच्या दंगलीत मुंबई सावरण्यासाठी पवारसाहेबांचेच नेतृत्व हवे, ही उद्योगपतींची साद होती. शिवाय काँग्रेस अंतर्गत राजकारणातही पवार साहेब मुंबईतच राहिलेल बरे, असे राव समर्थकांना वाटू लागले होते.

    शरदराव परतले आणि त्यांनी मुंबईला खरोखरीच सावरले. ते आले आणि काही काळातच बारा बॉम्बस्फोट झाले. उद्योगविश्वाचा मेरुमणी असणारे स्टॉक एस्चेंज स्फोटाने हादरले होते. लोक भयभीत झाले होते. पण पवारांनी कणखर नेतृत्वाचा प्रत्यय दिला. पोलिसांना लगेचच कामाला लावले. कटाचा शोध झटक्यात लावला गेला. आणि त्याच वेळी अवघ्या ३६ तासातच शेअर बाजारातील व्यवहार सुरु करून दाखवण्याची किमया शरदरावांनी करून दाखवली.त्यांचा तो साडे तीन वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा चौथा कालखंड राज्यासाठी व देशासाठीही प्रचंड संकटांचा होता.

    बॉम्बस्फोटाचे पडसाद विरण्याच्या आधीच लातूरचा भीषण भूकंप घडला. त्यातून सावरत असातनाच गोवारी कांड नागपुरात घडले. त्या साऱ्या तणावाच्या कालखंडात शरदरावांनी महाराष्ट्राची नौका तर सावरलीच, पण देशालाही संकट काळातील प्रशासकीय नेतृत्वाचा आदर्श दाखवला. म्हणूनच पुढे वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात शरदरावांकडे भूज भूकंपातून गुजरातला सावरण्याची मोठी जबाबदारी आली व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विरोधी खासदार असणाऱ्या शरदरावंनीही ती जबाबदारी नीट पार पाडली.

    पण हे प्रशासकीय कौशल्य शरदरावांना राजकीय स्तरावर का दाखवता आले नाही ? याचे वैषम्य आजही मराठी मनाला वाटल्याशिवाय राहात नाही ! ते लोकसभेचे विरोधी पक्षनेता होते. नंतर जेव्हा सत्तेची संधी आली तेव्हा काँग्रेसमधील काही नेत्यांनी, ज्यात प्रणव मुखर्जी आघाडीवर होते, सोनिया गांधींना घोड्यावर बसवले. आजच्या विरोधी पक्ष नेत्याकडे नंतरच्या सत्ताकाळात पक्षाचे संसदेतील नेतृत्व व पर्यायने पंतप्रधानपद येऊ शकते. पण पवारांची ती संधी हिरावून घेतली गेली.

    चिडलेल्या पवारांनी दुसऱ्यांदा काँग्रेस फोडण्याचा निर्णय त्यानंतर एक दोन वर्षात केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करताना त्यांना राष्ट्रीय वलय लाभले. पी. ए. संगमा आणि तारीक अन्वर अशा नेत्यांची साथ लाभली. या नेत्यांमुळे पवारांचे हे दुसरे बंड ही काँग्रेसमधील राष्ट्रीय फूट ठरले. त्या आधी शरदरावांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अद्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांनी सोनिया गांधींचे उमेदवार सीताराम केसरींना आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत शरदरावंना काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्षपद ताब्यात घेता आले नाही. आणि त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा बासनात गुंडाळल्या गेल्या.

    राजीव गांधींचे निकटवर्ती आणि इंदिरा गांधींचे खास विश्वासू वसंतराव साठे यांनीही दिल्ली त्या काळात गाजवली होती. त्यांच्याकडे केंद्रीय नभोवाणी मंत्रालय अनेक वर्षे होते आणि भारतात रंगीत टीव्ही सुरु करण्याचे श्रेयही साठेसाहेबांनाच जाते. इंदिराजींच्या भीषण हत्येनंतर दिल्लीत काँग्रेस अंतर्गत जे सत्ता नाट्य खेळले गेले, त्यात साठेंची भूमिका निर्णायक होती. कारण राजीव गांधींकडेच ही जबाबदारी गेली पाहिजे यावर ते ठाम राहिले. अन्यथा तेव्हाच नरसिंहरावांचा नंबर मंत्रीमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून नेतृत्वपदी लागला असता. साठेंनी गांधी घरण्यावरच अढळ निष्ठा ठेवली. त्यामुळे त्यांच्यात क्षमता असूनही त्यांनी देशाचे नेतृत्व करण्याचा विचारही कधी केला नाही. त्यांना राष्ट्रपतीपदाची महत्वाकांक्षा होती. पण विश्वनाथ प्रतापसिंगांनी काँग्रेस फोडल्यानंतर ते विरोधी पक्षाचे खासदार बनले आणि राजकारणात नंतर पुढे राहिले नाहीत. त्यांचा पराभव महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बहुजन पुढाऱ्यांची केला. जातीचा शिक्का त्यांच्या प्रगतीतील अडथळा ठरला.

    एकविसाव्या शतकातील दिल्लीतील मराठी माणसांचा आवाज बनले आहेत नितीनजी गडकरी. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांची कामगिरी चमकदार होती. पंतप्रधानपदाचे दावेदार ठरण्याएव्हढे मोठे त्यांचे नाव नक्कीच होते व आजही आहे. अजूनही मोदींनी जर नेतृत्व सोडले तर संघ गडकरींच्या नावाचा विचार करू शकेल का, अशा चर्चा राजकारणात रंगत असतात. प्रशासकीय व राजकीय कौशल्य गडकरींनी दाखवून दिलेलेच आहे. आता या पुढची संधी राजकारणात मिळणे हा काही प्रमाणात नशिबाचाही मामला असू शकतो.

    शरद पवार ह प्रकृतीने गंजलेले जरी असले तरी मनाने कणखर आहेतच आणि त्यांच्या महत्वाकांक्षेचे पंख कधीच मिटलेले नाहीत. त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकारणाची मांडणी त्यांनी आत्ताच सुरु केलेली आहे. शरद पवार हे पहिले मराठी पंतप्रधान बनू शकतात, असे शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचेही लाडके मत होते. एरवी निवडणूक प्रचारात पवारांचा उल्लेख ‘मैद्याचे पोते’ वगैरे शेलक्या शब्दात करणाऱ्या बाळासाहेबांनी पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा ‘शरदबाबूंना’च असेल हेही तितक्याच रोखठोकपणाने सांगून टाकले होते. त्यांनी जाहीरही केलेले होते की जर मराठी नेता पंतप्रधान बनणार असेल तर त्याला आमचा निःशंक पाठिंबाच राहील. तोच कित्ता त्यांचे सुपुत्र व सध्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवराव ठाकरे गिरवतील यातही शंका नाही. पण त्यांना स्वतःलाच राष्ट्रीय नेतृत्वाचे स्वप्न पडत असेल तर ? त्यांचे दिल्लीतील राजकारणातील उजवे हात आहेत संजय राऊत. राऊत यांनी त्यांचे गुरु शरदरावांप्रमाणेच संजय राऊत यांनी सत्ताकारणातील युती-आघाडीच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे असणारे नेटवर्किंग कौशल्य आपल्याकडे जबरदस्त असल्याचे दाखवून दिलेच आहे.

    राहूल गांधींनी आपल्याकडे पाहून स्मितहास्य केले तरी आपण धन्य झालो, असे मानणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना परवा संजय राऊतांनी, थक्क होऊन तोंडात बोटे घालून पाहात बसायला लावले…!! राहूल गांधीच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारत असल्याची चित्रे देशाने पाहिली. उद्या संजय राऊतांचा हात राहूल यांच्या खांद्यावर अलगद दिसला तरीही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राऊत हे एकतर त्यांच्या कौशल्याने शरद पवारांना त्या खुर्चीपर्यंत नेतील वा राहूल गांधींना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतील…!!

    हरपलेले नेतृत्व
    महाराष्ट्रातून अलिकडच्या काळात ज्यांना पंतप्रधानपदाची नक्की संधी मिळालीच असती असे आपण म्हणू शकतो असे एकच नाव डोळ्यापुढे येते , ते म्हणजे स्व. प्रमोद महाजन यांचे. महाजनांचे वागणे हे रा. स्व. संघातील काहींना न पटणारे होते खरे पण त्यांच्या भरंवशावर अटलजी, अडवाणींचे राजकारण पुढे गेले होते. त्यांच्याकडे विविध राजकीय पक्षांना एकत्र गुंफण्याचे मोठे कौशल्य होते. ते अशा पक्षात मोठे नेते होते, की काँग्रेस नंतर त्याच एका पक्षाला सत्तेची संधी लाभली. पण दुर्दैवाने निरंकुश सत्ता समोर दिसण्याच्या दहा एक वर्षे आधीच नियतीने महाजनांचा खेळ संपवला.

    काँग्रेस अंतर्गत राजकारणात अधिक संधी मिळू शकणारे आणखी एक मराठी नेतेही असेच लौकर गेले. विलासराव दशमुख. राजकरणातील त्यांचे खानदानी दीप्तीमान नेतृत्व त्यांच्याकडे असणारे हजरजबाबी वक्तृत्व यांच्या जोरावर त्यांनी दिल्ली काबीजही केली असती पण तेही लौकर हरपले.

    – अनिकेत जोशी