incredible india

१९४७ च्या अगोदरपासून जर आपण पर्यटनाचा अभ्यास करायला सुरवात केली तर असे दिसते की त्या काळात सर्वसामान्य भारतीयांकरिता “फिरायला जाणे” म्हणजे पर्यटन करणे ही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती.

    भारतातल्या पर्यटन क्षेत्रात( Indian Tourism Industry) स्वातंत्र्यानंतर (Independence Day 2021) कशाप्रकारे उत्क्रांती झाली आणि सुरुवातीला काहीसे दुर्लक्षित असलेले हे क्षेत्र, आज किती मोठ्या प्रमाणात समृद्ध झाले आहे याचा अभ्यास करण्याची वेळ स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर(75 Years Of Independence) आलेली आहे, असे जाणवायला लागते.

    फिरायला कुणाला आवडत नाही ? प्रत्येकालाच कुठे तरी दूरवर जावेसे वाटते.पण फिरून आल्यानंतर त्या सुंदर व सुखद आठवणी आपण सर्व नातेवाईकांना व मित्र सांगताना व छायाचित्रे पाठवताना आनंदित होऊन आपला उर भरून येतो व काही काळानंतर सर्व काही विसरून जातो. पण खरोखरच पर्यटन ही विसरण्यासारखी गोष्ट आहे का ? पर्यटन म्हणजे हा एक अभ्यास असून, अभ्यासाच्या एकाग्रतेने बघितले तर असंख्य गोष्टी दिसायला लागतात.

    शेवटी पर्यटन म्हणजे काय ? चोवीस तासापेक्षा जास्त दिवस एकट्याने किंवा कुटुंब, समुहाने एकत्रितरित्या राहत्या घरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी अथवा जंगलात राहून नवीन ठिकाणे खाणे पिणे, खरेदी, मनोरंजन, संवाद व भेटी यात काही काळ मन रमविणे, अभ्यास करून ते प्रफुल्लीत ठेवणे, म्हणजे पर्यटन. ही साधी साधी सरळ व सुटसुटीत पर्यटनाची व्याख्या आहे.

    १९४७ च्या अगोदरपासून जर आपण पर्यटनाचा अभ्यास करायला सुरवात केली तर असे दिसते की त्या काळात सर्वसामान्य भारतीयांकरिता “फिरायला जाणे” म्हणजे पर्यटन करणे ही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. ती श्रीमंतांची “हौस” होती. कारण “पर्यटन करावे लागते” ही संकल्पनाच त्या काळी भारतामध्ये अजिबात रूढ झालेली नव्हती. दुसरी बाब म्हणजे भारतीयांच्या घरची कमालीची आर्थिक गरिबी व त्यात कसे तरी करून कुटुंबाच्या पालन पोषणाची प्राथमिकता. त्यामुळे त्या काळात पर्यटन हे दूरदूर पर्यंत शक्यच नव्हते. पण त्या काळात अनेक भारतीयांनी बघितले कि इंग्रज शासनातले मोठमोठे अधिकारी, न्यायाधीश, गव्हर्नर, साहेबांचा वर्ग, आपल्या संपूर्ण प्रशासकीय व कौटुंबिक लवाजम्यासह हवापालट करण्याकरिता व गर्मीपासून बचाव करण्याकरिता थंड हवेच्या ठिकाणी तीन चार महिन्यांकरिता जात असत. त्या वेळेस अशा प्रवासाचे भारतीयांना कौतुक व नवलाई वाटत असे. कारण ही नवलाई ते प्रथमच बघत होते इंग्रज तसे अत्यंत जिनिअस होते. अनेक सुंदर व विलोभनीय पर्यटन स्थळे,धबधबे, दाट जंगलातल्या गुंफा, शिल्पे इंग्रजांनी शोधून काढली आणि कालांतराने हीच व आजूबाजूची ठिकाणे आज पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्धीस पावली आहेत.

    अजिंठा एलोरा गुंफा, बोरागुंफा, सिमला, कुलु मनाली,केम्पटी फोल्ल्स, डलहौसी, मसुरी, देहराडून अशा देशातील अनेक ठिकाणी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून इंग्रजांच्या वसाहती बघायला मिळतात. थोडक्यात ते कामाकरिता, फुरसतीचा वेळ घालविण्याकरिता पर्यटनाला गेले आणि नकळत पर्यटकांच्या मनोरंजनाचा मूळ आराखडा इंग्रजांच्या सवयीने भारतात तयार झाला असे मानायला हरकत नाही.
    मात्र स्वातंत्र्यानंतर या आराखड्याचे स्वरूप हळूहळू बदलत गेले आणि उच्चपदस्थांमध्ये भ्रमंतीचे बाळसे धरायला लागले. कारण प्रवास ही मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे.कधी याला इतिहासाची जोड असते तर कधी व्यापाराची. यातच मग आनंद मिळविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी प्रवास ही मुळची रोमन लोकांची कल्पना भारतात वेग धरायला लागली आणि मानवी समूह आणि संस्कृती यांची खऱ्या अर्थाने ओळख व्हायला लागली. कधी काळी इंग्रजांची व श्रीमंतांची मक्तेदारी असलेली पर्यटन व्यवस्थेची ही संकल्पना स्वातंत्र्यानंतरच्या पंचाहत्तर वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग, उच्च मध्यमवर्गीय, मध्यम वर्ग, सरकारी व खाजगी कर्मचारी, व्यापारी वर्ग, गृहिणी, शाळा, महाविद्यालये आणि गरीब वर्गापर्यंत आज विस्तारित झालेली बघायला मिळते. खऱ्या अर्थाने हिच आहे स्वातंत्र्यानंतरची सर्वासामान्यांकारिता पर्यटनातली उत्क्रांती! प्रवास याचा अर्थच “वर्तुळ” असा आहे..जेथून सुरवात केली तेथेच शेवटी परत येणे म्हणजे प्रवास..

    जगाच्या विकासामध्ये अनेक गोष्टींचा प्रादुर्भाव होतो व असंख्य गोष्टी या विकासाला पूरक आहेत व त्यात पर्यटनाला अजिबात दुर्लक्षित करता येत नाही.याचे महत्व अनेक राज्यांनी जाणले आहे. म्हणुनच स्वातंत्र्यानंतर आज पर्यटन हा अनेक राज्यांचा व प्रमुख देशांचा आर्थिक स्त्रोत झालेला दिसत आहे. विशेष करून समुद्राला लागून असलेले देश व राज्ये यांचा जवळपास ८० टक्के विकास या पर्यटनावर केंद्रित झालेला दिसतो. त्यामुळे पर्यटकांना अनेक प्रकारचे लाभ व सुविधा देण्यावर आज अनेक राज्यांचा व अनेक प्रवासी कंपन्यांचा कल झालेला आहे.

    स्वातंत्र्यानंतर पर्यटनाच्या सवलतींवर खाजगी कंपन्यांचा वर्षाव होत आहे आणि पर्यटक याकडे आकर्षितच होत आहेत. आजचे पर्यटक सुद्धा आता ४०/५० वर्षापूर्वींसारखे राहिलेले नाहीत. पहिले फक्त आपण कधीतरी मामाच्या गावाला झुकझुक गाडीमधून किवा कुठेतरी “फिरायला” जात होतो. पण आज तसे नाही. काळ बराच समोर निघून गेला आहे. प्रत्येक बाबतीत आज जागृती आलेली आहे. सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन, इंस्टाग्राम इ. मुळे आज कुठल्याही पर्यटन स्थळाची माहिती क्षणात प्राप्त होते हा मोठा बदल आहे. त्यामुळे चार पैसे जास्त गेले तरी चालतील पण कुठेही असुविधा व्हायला नको अशा प्रकारची मानसिकता आज स्वातंत्र्यानंतर तयार झालेली आहे. हा एक फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर काळात दिसायला लागला आहे.

    पर्यटन हा आज केवळ भारतातच नाही तर अनेक देशांचा आज आर्थिक कणा झालेला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक देशाच्या मुळ संस्कृतीवरसुद्धा अनेक अंगांनी पर्यटनाचा प्रचंड प्रभाव पडतो. आर्थिक प्रभावासोबतच सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक व एकंदरीतच या सार्वभौम प्रभावाचा उद्धेश ठेऊनच याचा अभ्यास करण्याकरिता व जनजागृती करिता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम विविध जाहिरातींच्या माध्यमातून दिसत आहे प्रत्येक देशांच्या सांस्कृतिक वारशांचे जतन करणे आणि स्थानिक लोकांचा पर्यटकांशी संवाद साधुन तो वारसा समजुन घेणे हा पर्यटन दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. नवीन ठिकाणी गेल्यानंतर स्थानिक लोक पर्यटकांचे कसे स्वागत करतात व किती आदरपुर्वक मानसन्मान देतात यावर त्या देशाची प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते.

    या प्रतिमेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून पर्यटनात “आदरातिथ्य” हा सुद्धा आज व्यावसायिक झालेला बघायला मिळतो. आदरतिथ्याचे “कंपनी करार“ ही एक नवीन संकल्पना सर्वत्र बघायला मिळते . विशेषतः राजस्थान मध्ये “ पधारो म्हारे देश” ही पर्यटनाची “tag line” झालेली दिसते. प्रत्येक देशाला त्यांचे त्यांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व असते व हाच त्यांचा वारसा असतो आणि हे सर्व बघण्यातला आनंद अवर्णनीय असतो व याद्वारे एक मैत्रीचे नवीन नाते त्या देशासोबत, राज्यांसोबत व स्थानिक लोकांसोबत, सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुरु होते. पर्यटनातले आधुनिक तंत्रज्ञान ही फार मोठी उपलब्धी मानल्या गेली आहे. यामधूनच मग “विकासा करिता पर्यटन” आणि “शैक्षणिक पर्यटन” .. आज देश विदेशात “शैक्षणिक सहल” , “वैद्यकीय पर्यटन” आयोजित करताना दिसतात. याद्वारे सुसंवाद व संपर्क माध्यमातुन माहितीचे नवे दालन कार्पोरेट संस्थे करिता खुले झालेले आहे व पर्यटनाची ही फार मोठी उपलब्धी आहे.

    क्रीडा क्षेत्र आणि पर्यटन याचे नाते अतिशय जवळचे आहे. ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, फुटबाल, क्रिकेट, टेनिस या व असे असंख्य खेळ बघण्याकरिता हजारो रुपयांचे तिकिटे काढून प्रेक्षक व दर्दी सतत प्रवास करत असतात. त्यातच पर्यटन आपोआपच होते. स्वातंत्र्या अगोदर अशी व्यवस्था नव्हती. पण पर्यटन म्हटले की चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था असणे हा भाग ओघानेच आला व याची नेमकी गरज ओळखूनच, मोठमोठे फाईव स्टार हॉटेल्स व समुद्र किनारी आलिशान रीसोर्टस आज तयार झालेले आहेत व आज हा एक प्रचंड आर्थिक उलाढालीचा व्यवसाय बनला आहे. पर्यटकांचा सर्वात जास्त खर्च याच ठिकाणी होतो कारण मनासारखी सुविधा प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते व कधी कधी वाट्टेल तो खर्च सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. हे लक्षात घेऊनच आज काल प्रायव्हेट कंपन्यांचे “पॅकेजेस” ही नवीन संकल्पना चांगलीच रुजली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे हे टूर ३ दिवसांपासून ते १५/२० दिवस पर्यंतच्या प्रवासाचे असतात व तसे पकेज खरेदी करावे लागते.व्यवस्थेच्य दृष्टीने सुद्धा हे सोयीचेच असते.

    जंगलाचे आकर्षण हा पर्यटनाचा मुख्य गाभा आहे नव्हे तो आत्माच आहे. जंगल म्हणजे केवळ झाडेझुडपे नाहीत तर त्यात राहणारे पक्षी, त्यांचे आवाज व प्रतिसाद देणारी शीळ त्या शांत वातावरणात मनाला प्रसन्न करुन जातात. असंख्य प्राण्यांचे अस्तित्व व त्यांना बघण्याचा मोह अनावर होतो व जंगल सफारी केल्याशिवाय रहावत नाही. खुल्या हत्ती व जिप्सी वरून, आणि काही खुल्या व बंद बसेसमध्ये जंगल सफारीची सोय आज अनेक ठिकाणी झाली आहे. काझीरंगा, बन्नेरघट्टआ, ताडोबा,केरळ, कान्हाकेसली इ.अनेक ठिकाणे आज प्रसिद्धीस आलेली आहेत. यामध्ये काम करणारे गरीब दुर्लक्षित पण मार्गदर्शन करणारे गाईड यांनी सुद्धा भाषेवर चांगलेच प्रभुत्व आत्मसात करून रोजगाराची संधी शोधली आहे.

    याच प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाने करव्हन धोरणाला मान्यता दिलेली आहे. दुर्गम भागात जेथे राहण्याची व भोजनाची उत्तम सोय व त्याठिकाणी फिरते हॉटेल व फिरते पार्क यांची व्यवस्था या धोरणात आहे. दुर्गम भागात राहण्याचा आनंद या मध्ये पर्यटक घेऊ शकतात.

    थोडक्यात स्वातंत्र्यापासून सुरु झालेले पर्यटनातले बदल आपण बघत असून आजच्या आधुनिक तांत्रिक युगातल्या करव्हन धोरणापर्यंत आपण येऊन मोठे प्रगती केलेली आहे आणि हीच स्वातंत्र्योत्तर काळातील फार मोठी उत्क्रांती आहे असे म्हणावसे वाटते.
    – श्रीकांत पवनीकर, पर्यटन लेखक 
    sppshrikant81 @gmail.com