जळगावात भाजपचे २७ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ ; तर शिवसेनेचा महापौर निश्‍चित

भाजपमधून महापौरपदासाठी उमेदवाराची निवड रविवारी (ता. १४) होणार होती. मात्र, त्याआधीच काही सदस्य गायब झाल्याची चर्चा सायंकाळी सुरू झाली. त्यामुळे ही बैठकही बारगळली. गायब झालेल्या सदस्यांची जी नावे समोर येत होती, ते सदस्य दुपारपासूनच ‘नॉट रिचेबल’ येत होते. 

  जळगाव : राज्यात सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाला धक्के सुरू झाले. सांगलीत भाजपकडे बहुमत असतानाही जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचा महापौर केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत बहुमतातील भाजपची सत्ता उलथाविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. भाजपच्या गोटातील सुमारे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असून, ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.
  महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपासून जळगाव महापालिकेत हालचाली सुरू होत्या. विद्यमान महापौरांची निवड येत्या गुरुवारी (ता. १८) होणार असून, तसा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. भाजपकडून विद्यमान महापौर भारती सोनवणेंनी मुदतवाढीसाठी, तर अन्य दोघांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

  भाजपचे सदस्य ‘नॉट रिचेबल’ 
  भाजपमधून महापौरपदासाठी उमेदवाराची निवड रविवारी (ता. १४) होणार होती. मात्र, त्याआधीच काही सदस्य गायब झाल्याची चर्चा सायंकाळी सुरू झाली. त्यामुळे ही बैठकही बारगळली. गायब झालेल्या सदस्यांची जी नावे समोर येत होती, ते सदस्य दुपारपासूनच ‘नॉट रिचेबल’ येत होते.

  २० पेक्षा जास्त सदस्य 
  ज्या सदस्यांची नावे समोर येत आहेत, त्यांची संख्या २० पेक्षा जास्त आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गेल्याच आठवड्यात जळगाव महापौर निवड बिनविरोध होऊ देणार नाही, असे संकेत दिले होते. आज ते स्पष्ट झाले. दुपारपर्यंत भाजपचे २० सदस्य शिवसेनेच्या सदस्यांसह मुंबईला गेल्याचे बोलले जात होते. सायंकाळपर्यंत हा आकडा २५ वर गेल्याचे समजते. महापौर निवड गुरुवारी (ता. १८) होणार आहे, तोपर्यंत आणखी काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  शिवसेनेला खडसेंची साथ 
  नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे संजय सावंत, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या या खेळीला माजी मंत्री एकनाथ खडसेंची साथ मिळाल्याचीही चर्चा आहे. खडसेसमर्थक सदस्यांसह गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळेंवर नाराज सदस्यांनी शिवसेनेशी ‘गट्टी’ करत भाजपला हादरा देण्याचे ठरवले, अशीही चर्चा आहे.

  असे आहे बलाबल 
  भाजप : ५७
  शिवसेना : १५
  एमआयएम : ०३
  एकूण : ७५

  नगरसेवक गायब झाल्यानंतर 
  भाजप : ३०
  गायब झालेले : २७ (अंदाजे)
  शिवसेना : १५
  एमआयएम : ०३