अपयश झाकण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन; भाजपच्या ”या” नेत्याचा गंभीर आरोप

    जळगाव : राज्यात जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या आडून अधिवेशन घेण्याचे टाळत आहे. मुळातच महाविकास आघाडी शासनात एकमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्याचा घाट रचल्याचा आरोप माजीमंत्री व भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

    दरम्यान दोन दिवसांच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभुमीवर महाजन यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, कोरोना काळात मंत्र्यांच्या कार्यक्रमाला व मोर्चांना होणारी गर्दी शासनाला दिसत नसावी. अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाऊ नये, यासाठी हा आटापीटा चालविला आहे. केवळ सोपस्कार म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरु, असा इशाराही त्यांनी दिला.

    महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.