गिरीश चौधरींनंतर मंदाताई खडसे ही सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर?

भोसरी येथील व्यवहार खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी संयुक्तरित्या केला होता. त्यामुळे गिरीश चौधरींनंतर जळगाव जिल्हा सहकारी दुध उद्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाताईं खडसे देखील सक्त वसुली संचालनालयाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

    जळगाव : भारतीय जनता पक्षातून अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्त वसुली संचलनालयाने काल १३ तास चौकशी नंतर ताब्यात घेतले आहे त्यानंतर खडसे यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे यांच्यावरही कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोसरी येथील व्यवहार खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी संयुक्तरित्या केला होता. त्यामुळे गिरीश चौधरींनंतर जळगाव जिल्हा सहकारी दुध उद्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाताईं खडसे देखील सक्त वसुली संचालनालयाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

    याच प्रकरणी खडसे यांचा राजीनामा

    एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल हा मात्र अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता. तर स्वत: खडसे यांनी झोटींग समितीचा अहवाल पटलावर मांडण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील ते शक्य झाले नव्हते. या समितीच्या अहवालामध्ये आपल्याला क्लिन चीट देण्यात आल्याचा दावा त्यांनी अनेकदा जाहीरपणे केला होता.

    ईडी केली तर आपण सिडी लावू

    भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर त्यांची मुंबईत चौकशी देखील करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांनी ईडी कारवाई केली तर आपण सिडी लावू असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. मात्र ही सिडी लावण्यापूर्वीच आता थेट त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक देखील करण्यात आली आहे.

    मंदाकिनी खडसेंवर कारवाई अटळ

    या जमिनीची मालकी ही गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे या दोन्हींच्या नावावर आहे. यामुळे चौधरी यांना अटक झाल्यानंतर मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये गतीमान घडामोडी घडण्याची शक्यता आहे.