जळगाव जिल्हयात शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी ; जिल्हाधिकार्‍यांची घोषणा

सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई होणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास शाळा बंद करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी आधीच दिले होते. यानुसार जिल्ह्याधिकार्‍यांनी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत.

    जळगाव: जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी आज जारी केले आहेत.
    जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारीच दिले होते. यानंतर शनिवारी सायंकाळी आणि रविवारी रूग्णसंख्येत वाढ झाली.
    या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून कडक कारवाईचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अर्थात या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई होणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास शाळा बंद करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी आधीच दिले होते. यानुसार जिल्ह्याधिकार्‍यांनी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत.