भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा: खडसेंविरोधात एक हजार पानी आरोपपत्र दाखल; पत्नी, जावयाचाही समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

  जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

  2016 मध्ये खडसे हे महसूल मंत्री असताना भूखंड खरेदीचा व्यवहार झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीने खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.

  5.73 कोटींची मालमत्ता जप्त

  चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवले गेल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी विशेष पीएमएलए कोर्टानं गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गेल्या आठवड्यात ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. 4 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँकेतील 86 लाख 28 हजार रुपये असा या कारवाईचा तपशील आहे.

  झोटिंग समितीने केली होती चौकशी

  भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असताना ती केवळ 3.75 कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता.

  ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ईडी, सीबीआय या केंद्राच्या यंत्रणा करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केले जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपाचा डाव आहे, खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे.

  - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस