भाजपाचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; एकनाथ खडसेंनी बनवला गिरीश महाजनांना जोरदार झटका देण्याचा मास्टरप्लान

महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. बैठकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे तब्बल 30 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाऊन सामील झाल्याची चर्चा आहे. माजीमंत्री गिरीश महाजन यांना हा जबर धक्का मानला जात आहे.

    जळगाव : सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केली असून, त्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क नेते संजय सावंत हे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने राज्यातील सत्तेचा उपयोग महापालिका ताब्यात घेण्यासाठी केल्याचे दिसून येत असून, या माध्यमातूनच भाजपाच्या नगरसेवकांना गळाला लावल्याची सूत्रांची माहिती आहे.

    महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. बैठकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे तब्बल 30 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाऊन सामील झाल्याची चर्चा आहे. माजीमंत्री गिरीश महाजन यांना हा जबर धक्का मानला जात आहे.

    महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार व्यूहरचना आखली असून, महापौरपदासाठी नगरसेविका तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित केले आहे. तसा व्हीप देखील गटनेते अनंत जोशी यांनी काढला. दुसरीकडे, उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

    दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुद्धा सक्रिय झाले असून भाजपाला जोरदार झटका देण्याची व्यूहरचना आखली असल्याचे समजते. ‘सांगली पॅटर्न’ राबवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. आगामी दोन दिवसात नव्या महापौरांची निवड होणार असून त्यापूर्वीच काही नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    57 सदस्य संख्या असलेल्या भाजपाकडे महापौरपद आहे मात्र आगामी दोन दिवसात 15 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असून त्यांनी मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी खडसे आणि सुरेश जैन यांची भेट घेतल्याची माहिती सूत्राने दिली.