girish mahajan

जळगाव : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाजन यांच्यावर मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली. त्याच दरम्यान व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. जवळपास ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतर देखील भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे.

दुसरीकडे, राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ललवाणी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपाचे नेते, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.