चाळीसगाव परिसरात नदी नाल्यांना पूर, शहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान

मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी - नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधा-यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावातील तितुर आणि डोंगरी या दोन नद्या ओसंडून वाहत आहेत. शासनाने काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या चाळीसगाव मधील मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून स्थानिकांमधे भितीचे वातावरण आहे.

    चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात आज सकाळपासून (मंगळवार) पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या दक्षिणेला असणा-या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहेत.

    या सर्व पुरस्थितीचा आमदार मंगेश चव्हाण व तहसिलदार अमोल मोरे हे आढावा घेत आहेत. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे. तर, शिवाजी घाट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलेअसून यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तितूर नदीलाही पूर आल्याने घाट रोडवरील जुन्या पुलावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

    मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी – नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधा-यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.