पावसाचा रौद्रावतार : चाळीसगाव जलमय, प्रशासनाने केलं एसडीआरएफच्या टीमला पाचारण

पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागविण्याची विनंती सचीव नियंत्रण कक्ष मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

    चाळीसगाव : गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव परिसरावर रूसलेल्या पावसाने अत्यंत रौद्र रूपात आगमन करून तालुक्यात हाहा:कार माजवला आहे. अचानक आलेल्या या जलसंकटामुळे परिसरातील नागरिकांसह प्रशासनाची धावपळ झाली असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. या पावसामुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

    या पुरात चाळीसगाव शहरातील दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथे संपर्क होऊ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागविण्याची विनंती सचीव नियंत्रण कक्ष मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. धुळे राज्य राखीव पोलीस बल तसेच एसडीआरएफ पथक पाठविण्याचे निर्देशानुसार मदत कार्य केले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

    सोमवारी रात्री चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला. मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्‍यातून किमान १५०० क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून हि वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

    दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

    कन्नड घाटात रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे देखिल उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतुक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि,मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत.