कार्यकर्ते म्हणतात ‘ठरलंय’, खडसे म्हणतात ‘नाही’

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार की नाही, यावरून अजूनही तळ्यात-मळ्यात चित्र असल्याचं दिसतंय.

खडसेंनी रविवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, अशी बातमी आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र स्वतः खडसेंनी राजीनाम्याच्या वृत्ताचा इन्कार केला. दुसरीकडं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याकडे खडसेंचा राजीनामा आला नसल्याचं म्हटलं. त्यामुळं खडसेंच्या पक्षांतराची चर्चा नेमक्या कशाच्या आधारावर सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला.

दुसरीकडं येत्या गुरुवारी म्हणजेच २२ ऑक्टोबर या दिवशी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणारच, असं खडसेंचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगतायत. भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे.  मात्र त्यांच्या पक्षांतराचा अर्थात सीमोल्लंघनाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. आता खडसेंच्या कार्यकर्त्यांनी गुरवारचा मुहूर्त जाहीर केलाय. त्यांचे विश्वासू कार्यकर्ते मुंबईला जाण्याची तयारी करत असल्याचंही कळतंय.

खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त राज्यभर पसरलं. मात्र, स्वत: खडसे यांनी त्याचा इन्कार करत मीडियावालेच माझ्या पक्षांतराचा मुहूर्त ठरवत असल्याचं म्हटलं. रावेर येथील चार अल्पवयीन भावंडांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख व खडसे हे एकाच वाहनातून पोहोचले होते. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चादेखील झाली होती.

तर एकनाथ खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याविषयी आपल्याला कुठलीही कल्पना नसून आपल्याकडं त्यांचा राजीनामा आलाच नसल्याचा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.