घरपट्टीत घाेळप्रकरणी नगरसेवक राजेंद्र चाैधरी अपात्र

नगराध्यक्षा असताना पदाचा दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असतानाही स्वतःसाठी मात्र कमी घरपट्टी लागू केली आणि नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले.

जळगाव : सावदा येथील नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी २०११ ते २०१६ या कालखंडात पत्नी नगराध्यक्षा असताना पदाचा दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असतानाही स्वतःसाठी मात्र कमी घरपट्टी लागू केली आणि नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जावर आज सोमवारी ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आला, असून तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करून नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना नगरसेवक पदावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र घोषित केले आहे.
अजय भागवत भारंबे, रा. सावदा यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले होते. त्यानुसार आज सोमवारी त्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला. त्यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत पत्नी नगराध्यक्षा असताना स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा आरोप सत्य असल्याचा निष्कर्ष निघत आहे. स्वतःच्या घरासाठी त्यांनी जुन्या दराप्रमाणे घरपट्टीचे दर लावले असे तक्रारीत नमूद आहे. आजपावेतो जुन्याच दराने घरपट्टी भरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.