Sant Bahinabai Chudhari utter Maharashtra university
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

  • परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी परीक्षांच्या स्वरूपाविषयी दिली माहिती

जळगाव (Jalgaon) कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले जाणार असून अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. दि. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होऊन ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. विशेष म्हणजे या लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी असणार आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी या परीक्षांच्या स्वरूपाविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. राज्यशासनाने या परीक्षांचे स्वरूप ठरविण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक पातळीवर परीक्षा आयोजन व वेळापत्रक निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींचा अहवाल दि. ५ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी घेण्याचा निर्णय झाला. पदवी परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा राहणार असून परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांची असेल. तर पदव्युत्तर परीक्षेसाठी ६० गुणांची परीक्षा व १२० मिनिटांचा कालावधी असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर पासून सुरु होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळा‍वर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षांचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल :
१) प्रात्यक्षिक परीक्षा :   पदविका, पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील / अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाद्वारे घेण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि. २९ एप्रिल, २०२० च्या मार्गदर्शक सूचनेतील अ.क्र. ११, राज्यस्तरीय समितीच्या दि. ०८ मे, २०२० च्या शिफारशींमधील अ.क्र. ४ मधील आणि राज्यस्तरीय समितीच्या दि. ०२ सप्टेंबर, २०२० च्या शिफारशींमधील मुद्दा क्र. ४ व ५ मध्ये नमूद केल्यानुसार महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन हे विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्यस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायाप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलावता त्याचे मूल्यमापन हे दि. १३ मार्च, २०२० पर्यंत संबंधित विषयांचे नियमित झालेले प्रात्यक्षिके, जर्नल्स, टर्मवर्क, अंतर्गत मौखिक परीक्षा, विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती अथवा अभ्यासक्रमात नमूद तत्सम तरतुदी यांच्या आधारे व Online माध्यमातून /दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रात्यक्षिकावर आधारीत मौखिक परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल.

ज्या अभ्यासक्रमांतर्गत मौखिक परीक्षा किंवा प्रकल्प अहवालावर (Project) आधारीत मौखिक परीक्षा आहे, त्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न बोलविता दूरध्वनीद्वारे मुलाखत, स्काईप किंवा इतर ऑनलाईन माध्यमाद्वारे PPT सादरीकरणाद्वारे करता येईल. ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवाल जमा झालेले नसतील त्यांचे सॉफ्टकॉपीच्या आधारे अभ्यासक्रमामधील नमूद आराखड्याप्रमाणे मूल्यमापन करण्यात येईल. अंतिम वर्षातील पूनर्परीक्षार्थी (Backlog) विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे व पद्व्युत्तर वर्गाच्या प्रकल्पाचे मूल्यमापन देखील वरील प्रमाणे करण्यात येईल. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर जाहीर करावे.