देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी, कारण काय ? :  वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील.

    जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील.

    जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्षबांधणी संदर्भात ही रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या आजी माजी दहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याबाबत फडणवीस रक्षा खडसे यांच्याशी चर्चा करु शकतात.

    खडसे-फडणवीस यांच्यात राजकीय वैर

    माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आरोपाचे खंडन केले होते. मात्र, नंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

    खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेल्या भेटीने उंचावल्या नजरा-

    दोन्ही नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप असताना फडणवीस यांनी खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेली सदिच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राजकीय गणिते ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत. ‘मिशन लोटस’चा हा एक भाग असल्याची शक्यता आहे.

    देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला

    विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.