भाजपात ‘मेगा’गळती सुरू. खडसेंसोबत कोण कोण जाणार?

माझ्यासोबत आणखी 15-16 माजी आमदार आहेत, ते शुक्रवारी मुंबईत येतील. विद्यमान आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे अडचण आहे. परंतु, नंतर तेदेखील टप्प्याटप्प्याने सोबत येतील, असा दावा खडसे यांनी केला आहे.

जळगाव : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा आणि ओबीसी नेता अशी ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा ग्रँड सोहळा मुंबईत रंगणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपला नजीकच्या काळात जोरदार धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षाकडून न्याय मिळाला नाही, म्हणून समर्थकांशी बोलून आपण पक्षांतर केले. माझ्यासोबत आणखी 15-16 माजी आमदार आहेत, ते शुक्रवारी मुंबईत येतील. विद्यमान आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे अडचण आहे. परंतु, नंतर तेदेखील टप्प्याटप्प्याने सोबत येतील, असा दावा खडसे यांनी केला आहे.

यामुळे केली राष्ट्रवादीची निवड

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर, गुरुवारी मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्महाऊसवर काही वृत्तवाहिन्यांसह पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या भागात नेतृत्व नसल्यानेच आपण राष्ट्रवादीची निवड केल्याचेही स्पष्ट केले. मला शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर होतीच, असेही त्यांनी सांगितले. आपल्याबाबतीत पक्षाने घेतलेला सामूहिक निर्णय असेल म्हणून मी न्यायाची अपेक्षा करत होतो. एकेक विषयावर मी फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करत होतो. माझ्याबाबतीत जे काही घडले ते जनतेला माहिती आहे, असेही खडसे म्हणाले.

माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी अमित शहा, जे. पी. नड्डा यांना भेटून कैफियत मांडली होती. परंतु, माझ्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीच्या माहितीची पेरणी झाल्याने न्याय मिळू शकला नाही. फडणवीसांच्या सांगण्यानुसार मी अर्धसत्य बोलत असेन, तर नेमके काय घडले, हे त्यांनीच सांगावे.

एकनाथ खडसे, माजी मंत्री

नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेले याचा मला धक्का बसला, कारण नाथाभाऊ जाणार नाही, असे मी वेळोवेळी म्हटले होते. याची वेदना, खंत व खेद वाटतो, अशी भावना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केली. अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या ऑफरबद्दल मुंडे म्हणाल्या की, खोतकरांनी दिलेल्या ऑफरबद्दल मी त्यांचे आभार मानते. सोशल मीडिया माध्यमातून ते ऐकले आहे. ओबीसींची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षा, पीडित वंचितांच्या अपेक्षा यासाठी मी राजकारणात आली आहे व शेवटपर्यंत राहणार आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणिते असू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल, असेही ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असे उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

भाजपसाठी नाथाभाऊंनी मोठे योगदान दिले होते. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. ज्यांनी सत्ता आणण्यासाठी मदत केली त्यांची होत असलेली अवहेलना खडसेंना सहन झाली नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर भाजपात गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत त्यामुळेच भाजपात अस्वस्थता आहे, असेही थोरात यांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक जणांनी भाजपाची वाट धरली होती. मात्र भाजपाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्षे राज्याचा कारभार चालवला याचा पोटशूळ काहींना उठला आहे. यामुळे एकनाथ खडसे यांचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची इमेज बदनाम करण्यासाठी खडसे यांचा वापर करण्यात आलेला आहे. खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसे यांना आपल्या पक्षात घेतले आहे. खडसे यांनी आता गेलेल्या ठिकाणी राहून समाजोपयोगी कार्य करावे आम्ही त्यांना नांदा सौख्यभरे असेच म्हणतो, असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.

अंजली दमानियांनी खडसेंना खडसावले

कोणत्याही पत्रकार परिषदेत माझे नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या दाव्याचे खंडन केले. तसेच त्यांच्याविरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही, असेही सांगितले. या प्रकरणी अजून आरोपपत्रच दाखल झालेले नाही तर खटला संपला कसा?, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला आहे.