eknath khadse

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची चौकशी लावली तर सीडी लावेन, असे मी म्हणालो होतो. ते खरेच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस चौकशी करीत आहेत. चौकशीचा अहवाल आला की मी तो अहवाल जाहीर करणार असल्याचे सांगत ती सीडी योग्यवेळी लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

  जळगाव : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महसूल मंत्री एकनात खडसे यांनी भाजपाला पुन्हा एकदा गर्भीत इशारा दिला आहे.

  अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची चौकशी लावली तर सीडी लावेन, असे मी म्हणालो होतो. ते खरेच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस चौकशी करीत आहेत. चौकशीचा अहवाल आला की मी तो अहवाल जाहीर करणार असल्याचे सांगत ती सीडी योग्यवेळी लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

  एकेकाळी भाजपाचे राज्यातील बलाढ्य नेते अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आपल्यावरील आरोपांची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे खडसे त्यावेळी म्हणाले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळेच खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले, अशी चर्चा त्यावेळी रंगली. यानंतर चौकशीच्या कालावधीत खडसे भाजपातून अडगळीत पडले होते.

  राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी प्रवेशावेळी खडसे यांनी माझ्या मागे ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन, असा इशारा भाजपाला विधान दिला होता. त्यांच्या या विधानानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र, बोलल्याप्रमाणे खडसे यांनी अद्यापपावेतो ती सीडी लावलेली नाही. यावर बोलताना, खडसेंनी योग्य वेळी सीडी लावण्याचे सूतोवाच केले.

  जे भ्रष्टाचार करतात, त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की पाटलांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी, असे खडसे म्हणाले. माझी ईडीची चौकशी लावली हे त्यांनी मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही खडसेंनी लगावला. माझा दोष काय ते सांगा, असे मी विधानसभेत वारंवार विचारले. जर मी दोषी असेल तर मला फाशी द्या. आता ईडीने चौकशी लावली. चूक असेल तर कारवाई होईल. न्यायालयात जे काय व्हायचे आहे ते होईल, असेही खडसे पुढे म्हणाले.

  मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. या काळात माझ्यावर एकही आक्षेप घेण्यात आलेला नाही. राजकारणात कधी कुणी माझ्या विरोधात बोलले नाही. पण जमिनीबाबतचा हा आरोप माझ्यावर हेतुपुरस्सर लावण्यात आलेला आहे. न्यायालयानेही सांगितले आहे की या आरोपांमध्ये तथ्य नाही. कर नाही त्याला डर कशाला. भीती नसल्यामुळेच आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहोत.

  - एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस