धक्कादायक ! श्रीराम मंदिरासाठी बनावट पावती पुस्तक

साऱ्या देशातून तसेच परदेशातून सुद्धा अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी गोळा करण्यात येत असतांना व भाविकांकडून त्यासाठी सढळ हस्ते व धार्मिक भावना ठेऊन देणगी दिली जात असतांना त्याच नावाने फसवणूक करण्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत

    जळगाव : साऱ्या देशातून तसेच परदेशातून सुद्धा अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी गोळा करण्यात येत असतांना व भाविकांकडून त्यासाठी सढळ हस्ते व धार्मिक भावना ठेऊन देणगी दिली जात असतांना त्याच नावाने फसवणूक करण्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत. शहरात बनावट पावती पुस्तकासह एक तरुणाला देणगी वसूल करतांना पकडण्यात आले असून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकार उघड केली आहे.

    शहराच्या वल्लभदास वालजी तथा गोलानी मार्केट परिसरातून राजेंद्र भास्करराव सोनवणे, राहणार चाळीसगाव घाटरोड असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून साई चैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषदद्वारा संचालित असे छापील पावती पुस्तक त्याचे जवळ आढळून आले आहे.राकेश लोहार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जळगाव शहरात अशाप्रकारे प्रभू श्रीराम यांच्या नावाने मंदिरासाठी बनावट पावती पुस्तक छापून किती रक्कम वसूल करण्यात आली असावी हा प्रश्न उपस्थित झाला आहे.