अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर चौघांची हत्या

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

जळगाव : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुकेश संन्याल, राज उर्फ गुड्ड्या, सुनील सीताराम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांसह एका अल्पवयीन आरोपीचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि श्वानपथकाच्या मदतीने पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. दरम्यान, या घटनेत अल्पवयीन पीडितेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पीडितेच्या मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदनात तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा आहेत. नराधम अत्याचार करत असताना ती प्रतिकार करत असल्यामुळे या जखमा झाल्याचा वैद्यकीय सूत्रांचा अंदाज आहे. पीडितेच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पीडितेवर सामूहिक अत्याचार झाला की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

आरोपी मोठ्या भावाचेच मित्र

आई-वडिलांसह मध्यप्रदेशला जाणाऱ्या मोठ्या भावाने चार चिमुकल्यांची काळजी घेण्याची विनंती आपल्या चारही मित्रांना केली होती. मात्र, नराधम मित्रांनी दारूच्या नशेत मध्यरात्री भिलाला यांच्या घरी जाऊन सुरुवातीला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यावेळी इतर तिघे भावंडे झोपेतून जागे झाले. त्यानंतर नराधमांनी पीडित मुलीसह चारही भावंडांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. हत्याकांडाची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गावाला गेलेल्या मृतांच्या मोठ्या भावाला विचारपूस केली. त्याने घराकडे लक्ष ठेवण्यासाठी ज्या मित्रांना सांगितले होते, त्यांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी घटनाक्रम उलगडला.

जलदगती न्यायालयात चालवणार खटला

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी तातडीने जळगाव दौरा केला. त्यांनी घटनास्थळी पाहणी करत पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना, हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशमुख यांनी आदिवासी वसतिगृहात हलविण्यात आलेल्या पीडित भिलाला कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.


ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीपासून पोलिसांनी चांगल्या रितीने केला आहे. त्यामुळे पोलिसांना पॉझिटिव्ह इव्हिडन्स मिळालेले आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी योग्यरितीने चौकशी केलेली आहे. हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करीत असल्याची घोषणा देखील अनिल देशमुख यांनी केली