सुनगाव येथे शॉट सर्किटमुळे घराला आग; शेजारच्या नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न

सुनगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे घनश्याम राजपूत यांच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह घरातील भांडी, कपडे जळून खाक झाले.

    जळगाव (Jalgaon).  सुनगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे घनश्याम राजपूत यांच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह घरातील भांडी, कपडे जळून खाक झाले. प्राप्त माहितीनुसार, राजपूत यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्री उशीरा शेतातून आलेले श्याम इंगळे, अक्षय गिऱ्हे, अमोल ढगे, अनिल वसुलकार, अर्जुन ढगे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले.

    विद्युत पुरवठा खंडित केला. तोपर्यंत आग भडकली होती. आगीच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या. शेजारच्या नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. एका तासाने आग आटोक्यात आली. आग नियंत्रित करण्यासाठी श्रीराम इंगळे, अनिल तिवारी, बळीराम इंगळे, गजानन जवंजाळ, पुर्णाजी धुळे, संजय निमकर्डे, पांडुरंग इंगळे, उमेश कुरवाडे, गणेश कतोरे, अनिल वसूलकार, अक्षय गिऱ्हे, अमोल ढगे, अर्जुन ढगे यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला.