गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं; एकनाथ खडसेंचा टोला

    जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन फक्त पोरींचे फोन उचलतात, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं. यासंदर्भातील खडसेंची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून राजकारण तापलं आहे. खडसेंच्या या वक्तव्याला महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

    मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं, अशी खोचक टीका गिरीश महाजनांनी केली. याला खडसे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

    खडसेंचं टिकास्त्र

    जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्‍यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत. गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असा इशारा खडसेंनी दिलाय.

    गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत, असा टोलाही एकनाथ खडसेंनी महाजनांना लगावलाय.