माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?; एकनाथ खडसेंचा विरोधकांना टोला

माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, असा टोला खडसे यांनी विरोधकांना लगावला.

    जळगाव : आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात छापे टाकले. यावेळी 12 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

    दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाष्य केलं आहे. बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

    खडसे नेमकं काय म्हणाले ?

    बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो, असं खडसे म्हणाले. तसेचं माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, असा टोला खडसे यांनी विरोधकांना लगावला.

    तसेचं बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असं नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.