रस्त्यावरील खड्ड्यांकडे जळगाव प्रशासनाचे दुर्लक्ष, मनसेने केली खड्ड्यांची पूजा

"शहरातील खड्डे बुजले जावेत अन्यथा संपूर्ण शहरातील खड्ड्यांची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तृतीयपंथीयांच्या हातून सत्यनारायणाची पूजा करू.” असा इशारा जळगाव पालिका प्रशासनाला मनसेचे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी दिला आहे.

    जळगाव शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते थाळनेर दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्यांकडे जळगाव प्रशासनाचे लक्ष नसल्याने मनसेने खड्ड्यांची पूजा करत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

    जळगावात ग्रामीण पोलीस स्टेशन, थाळनेर दरवाजाकडे जाणारा रस्ता, नगरपालिका दवाखान्यासमोरील रस्ता या भागात दररोज वाहने व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वरदळ असते. पण या मोक्यांच्या ठिकाणांवरच खड्डे असल्याने अनेक वाहन चालकांना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाण देखील वाढलं आहे.

    नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरणासाठी तसेच इतर उपचारासाठी अनेक लोक येत असतात. पण, या खड्ड्यांमुळे आधीच आजारी असलेल्या नागरिकांना खड्डे चुकवत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

    शहरात इतर ठिकाणीही बरेच खड्डे आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करते. त्यामुळे, मनसेचे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी या खड्ड्याची पूजा करून नगरपालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

    “या खड्ड्यांसह शहरातील इतर भागातीलही खड्डे बुजले जावेत अन्यथा संपूर्ण शहरातील खड्ड्यांची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तृतीयपंथीयांच्या हातून सत्यनारायणाची पूजा करू.” असा इशारा जळगाव पालिका प्रशासनाला मनसेचे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी दिला आहे.