Jalgaon Floods: चाळीसगावात पावसाचे रौद्ररूप; 600 जनावरे गेली वाहून, 10 जणांचा मृत्यू

  जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात मंगळवारी पावसाचे रौद्ररूप पहायला मिळाले. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गाव पाण्याखाली गेली असून अनेक गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास 500 ते 600 जनावरे वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे. पुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

  अनेकांचे संसार उघड्यावर

  तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. गावांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक पुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. हे पाणी नागरी वस्तींमध्ये शिरले असून अनेक ठीकाणी बाजारपेठादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.

  मोठी जीवित आणि वित्तहानी

  मुसळधार पावसामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घाट भागात अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. 500 ते 600 गुरे पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून 3 ते 4 मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागले आहे. पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील 8 ते 10 गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

  नांदेडला तिघे जण गेले वाहून

  नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दोन तालुक्यासह सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात तीन जण वाहून गेले. त्याचबरोबर विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्याने मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यातून एक हजार 401 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊसही झाला.

  कन्नड घाटात दरड कोसळली

  कन्नड भागात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास कन्नड घाटात दरड कोसळली. काही गाड्यावरही दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, घाटात अनेक वाहने अडकली आहेत. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहने अडकली आहेत. पावसाची संततधार सुरूच असल्यानं दरड हटवण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.