नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं, गुलाबराव पाटलांची खरमरीत टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

    जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते.

    दरम्यान त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे” असा टोला पाटील यांनी लगावला. तसेचं एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

    नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं, गुलाबराव पाटील यांचं हे विधान राणेंना तंतोतंत लागू पडते असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...

    राणे नेमकं काय म्हणाले होते? 

    नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा काल वसईत पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही नारायण राणे यांनी केला होता.

    एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

    एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे