माजी मंत्री एकनाथ खडसे
माजी मंत्री एकनाथ खडसे

जळगाव : भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खडसेंच्या प्रवेशाविषयी चर्चा झाली. मात्र या प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये काही जण सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, खडसेंच्या प्रवेशामुुळे कोणकोणत्या मतदारसंघांवर प्रभाव पडू शकतो, याविषयी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सन २०१४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता खेचून आणण्यात मोलाचा वाटा राहीलेले भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे सध्या बंडाच्या पावित्र्यात आहेत. बीड येथे पंकजा मुंडे यांच्या झालेल्या मेळाव्यात ‘माझा काही भरवसा नाही’ असे सुतोवाचही केलेच होते. भाजपच्या सत्ताकाळात कथित आरोपांमुळे मंत्रीपद गेल्यापासून एकनाथराव खडसे भाजपावर नाराज आहेत. ज्या-ज्या वेळी संधी मिळेल त्या-त्यावेळी खडसेंनी पक्षनेतृत्वावर टीकेची झोड उठविली. राज्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे शितयुध्द सुरूच होते. आता तर खडसे यांनी फडणवीसांवर उघड आरोप आणि टिकाही केली आहे. त्यामुळे खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा होत आहे.