girish mahajan

त्या तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो - गिरीश महाजन

जळगाव: खंडणी प्रकरणीपुण्यात आपल्या विरोधात राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.  या राजकीय षडयंत्राचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत गिरीश महाजन यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाजन यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत.
तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावेळी महाजन मंत्रीपदावर होते.  ते म्हणाले की, ‘त्या तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो.’
या घटनेच्या सखोल चौकशी साठी महाजन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. ‘त्यामुळे सत्य बाहेर पडेल, असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापूरतीच मर्यादित आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीवर इतर समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, असे संस्थेच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. मी ओबीसी असून माझे इतर सहकारी वेगवेगळ्या समाजातील आहेत. मग ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? आम्ही ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल का? असे सवाल  महाजन यांनी केले