संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदाची आशा; म्हणे, अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील 

    जळगाव : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरून मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, जळगाव दौऱ्यावर असताना राठोड यांनी मंत्रिपदाबाबत आशादायी वक्तव्य केले आहे. मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

    मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातही काही बदल केले जाणार असल्याची चर्चा आताच्या घडीला राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहे. यातच राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री राठोड अजूनही मंत्रिमंडळाबाबत आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहेत.

    पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राठोड म्हणाले. मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

    आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. समाज बांधवांशी चर्चा करीत आहोत. त्यांना काय हवे नको, त्याकडे जातीने लक्ष घालत आहे. पूजा चव्हाण प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू आहे. योग्य वेळ येईल, तेव्हा मी निश्तितपणे बोलेल.

    - संजय राठोड, शिवसेना नेते