हतनूर धरणाचे तब्बल ‘इतके’ दरवाजे उघडले; नागरिकांसाठी सावधतेचा इशारा

हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज सकाळी अकराला प्रकल्पाचे ८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून २३ हजार ५२३ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती धरणावरील सूत्रांनी दिली.

    जळगाव : हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज सकाळी अकराला प्रकल्पाचे ८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून २३ हजार ५२३ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती धरणावरील सूत्रांनी दिली. जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी आतापर्यत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात ६.३ मि.मी पावसाची नोंद झाली असून १.४० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

    दरम्यान प्रकल्प पाणीपातळी २०९.७४० मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे ८ मिटरने उघडण्यात आले आहेत. गेल्यावर्षी (२०२०) देखील मान्सूनच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे १४ जून रोजी पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील मोठया प्रकल्पांपैकी हतनूर मधून प्रथमतः १४ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात येवून १३ हजार ८४५ क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला होता.

    नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    आज प्रकल्प पाणीपातळीत वाढ झाल्याने सकाळी ११ वाजता एक मिटरने उघडून ५५०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. धरणाच्या पाण्यात आणखी वाढ झाल्याने दूपारी दोनला ८ दरवाजे उघडण्यात आले. आता २३ हजार ५२३ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नागरीकांनी नदीपात्रात जावू नये अथवा जनावरे सोडू नयेत असे आवाहन प्रकल्प पाटबंधारे कार्यकारी अभियंता एन.पी महाजन यांनी केले आहे.