प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना या महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये ही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. परंतु, खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच देयक आकारण्याचे बंधनकारक केले आहे.

    जालना: कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना योग्य उपचार देत असताना शासन निर्णयानुसार देयक आकारण्याचे शासनाने बंधनकारक केलेले आहे. मात्र अनेक रुग्णालयांकडून नियम पायदळी तुडवत अवाच्यासव्वा बिले आकारताना दिसत असत आहे. अशाच प्रकारे जालना जिल्ह्यातील भरमसाठ पैसे उकळलेल्या १२ खासगी कोविडसेंटरला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी चांगलाच दणका दिला आहे. शासन नियमापेक्षा रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम रुग्णांना येत्या सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी या कोविड रुग्णालयांना यावेळी दिले आहे.

    यामध्ये शहरातील निरामय हॉस्पिटल, जालना क्रिटीकल केअर, सांगळे हॉस्पिटल, ओजस हॉस्पिटल, विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स, संतकृपा हॉस्पिटल, अंबेकर हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल, सेवाभारती कोविड हॉस्पिटल, व्यंकटेश्वर हॉस्पिटल, शिंदे बालरुग्णालय, जालना तर अंबड येथील सह्याद्री हॉस्पिटल या १२ खासगी दवाखान्यांच्या प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    ‘कोरोना या महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये ही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. परंतु, खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच देयक आकारण्याचे बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत देयके तपासण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली असून त्यामध्ये जिल्ह्यातील १२ दवाखान्यांनी शासन नियमापेक्षा २९१ रुग्णांकडून एकूण १७ लाख ५२ हजार ३२७ रुपये अधिकचे घेण्यात आले आहेत.’