diliprao tour

जालना. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीपराव भाऊसाहेब तौर यांचे आज बुधवारी  सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे.

दिलीपराव तौर यांना बुधवारी पहाटे अचानक त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घनसावंगी तालुक्यातील लिंबी येथील मूळचे रहिवाशी असलेले दिलीपराव तौर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जनता पार्टीच्या काळापासून झाली होती.

त्यांनी आणीबाणीच्या काळात भाजपचे पूर्णवेळ काम केले. त्यांनी  भाजपाचे संघटनमंत्री म्हणून अनेक वर्षे काम करून त्याकाळात भाजपचे जालना जिल्ह्यात काम वाढविण्यासाठी मोठा प्रवास केला. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी काही काळ राज्य परिवहन महामंडळाचे संचालकपद उपभोगले. याकाळात त्यांनी अनेक जनहिताची कामे केलीत.

यानंतर भारतीय जनता पार्टीचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणूनही तौर यांनी काम केले आहे. तौर यांनी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून जालना शहरातील चंदनझिरासारख्या भागातील मजूर- कामगार- गोरगरिबांच्या मुलासाठी दर्जेदार शिक्षणासाठी शाळा सुरु केलेली आहे. तौर यांचा जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी संबंध होता. तौर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.