जालन्यातील भयावह परिस्थिती, अग्निशमन यंत्रणेशिवाय स्त्री रुग्णालयाचा कारभार

जालना (Jalna). शहरात मध्यवस्तीत दोन वर्षांपूर्वी सुसज्ज आणि देखण्या इमारतीमध्ये स्त्री रुग्णालयाचे स्थलांतर झाले. भव्य दिव्य इमारत आहे, भविष्यात कितीही अत्याधुनिक यंत्रणा आली आणि कितीही रुग्णसंख्या वाढली तरी ही इमारत सक्षम आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही इमारत ताब्यात घेताना अग्निशमन यंत्रणा (फायर ऑडिट) कार्यान्वित आहे का? किंवा नाही याची पाहणी केलेली नाही. त्यामुळे आजही या स्त्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणांमध्ये हे एक थेंब देखील पाणी नाही, एवढेच नव्हे तर पावडरच्या सिलेंडरची देखील मुदत २६ जानेवारी २०२० ला संपणार आहे. मात्र, आजही अशा प्रकारचे सिलेंडर्स इथे लावलेले आहेत. दरम्यान, काल भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सिलेंडरवरील स्टीकर बदलल्याचे ही आढळून आले आहे.

एकावेळी ३५ नवजात शिशूंची व्यवस्था
रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर एका बाजूला प्रसूतिगृह आणि दुसऱ्या बाजूला नवजात शिशुंसाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. येथे शून्य ते 28 दिवसांच्या नवजात शिशुंवर उपचार केले जातात. त्यामध्ये येथे प्रसूती झाली असली तरीही त्या बालकांवर उपचार करतात आणि अन्य रुग्णालयात खासगी असो वा सरकारी तेथून जरी बालक उपचारासाठी येथे आले तरीही त्याच्यावर उपचार केले जातात. अशाप्रकारच्या सुमारे तीस बालकांवर एकाच वेळी उपचार होतील, अशी येथे व्यवस्था आहे. त्यामध्ये काचेची पेटी, कावीळ असलेल्या मुलांसाठी लाईटच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी, बाळाच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनचा पुरवठा मोजण्यासाठीचे पल्स ऑक्सी मीटर, सलाईन देण्यासाठी सिरीज पंप, अशी वेगवेगळी यंत्रणा कार्यरत आहे. त्यासोबत मध्यवर्ती प्राणवायू (ऑक्सिजन) देखील येथे चोवीस तास उपलब्ध आहे. नवजात शिशु कक्षामध्ये स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र शिवाजी पाटील, यांच्या नियंत्रणाखाली या शिशु कक्षाचे प्रमुख प्रभारी म्हणून डॉक्टर एल. के. धुमाळ, डॉ. रवींद्र बेदरकर, डॉ. नंदकिशोर पालवे, डॉ. अमोल केळकर हे कार्यरत आहेत.

अग्नीसुरक्षा तपासणी
भंडारा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर काल आरोग्य विभागाचे आयुक्त रामस्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांची एक बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांची उपस्थिती होती. सध्या जालना स्त्री रुग्णालयात अग्नीसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) झाले असल्याचे आरोग्य प्रशासन सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही यंत्रणा येथे कार्यरत झाली नाही हे देखील दिसत आहे. कारण आग लागल्यानंतर पाणी फवारण्यासाठी जी यंत्रणा आहे, ती जिथे पूर्ण झालेली नाही. एवढेच नव्हे तर या हौदामधून या यंत्रणेला पाणी मिळेल याची व्यवस्था केली जाते. त्या हौदातच पाणी सोडण्यासाठी नळयोजना नाही. त्यासोबत 3 एचपीची मोटर फक्त दोन नट-बोल्टवर अवलंबून असलेल्या पाईप लाईनवर बसलेली आहे. याहीपेक्षा जास्त पुढचा कहर म्हणजे प्रत्येक मजल्यावर या यंत्रणेची जोडणी करण्यासाठी वॉल्व बसण्यासाठी जागा सोडण्यात आलेली आहे, मात्र ते बसवलेले नाहीत. त्यामुळे या अशा ठिकाणांचा वापर रुग्णांच्या नातेवाईकांनी कपडे वाळत घालण्यासाठी देखील सुरू केला आहे. पावडरची अग्निशमन यंत्रणा “असून अडचण नसून खोळंबा” आहे. अग्निशमन बंब दिसत आहेत, मात्र त्यांची मुदत मागील वर्षी संपलेली आहे.

एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये चार पाच ठिकाणी बसवलेल्या बंबांची मुदत मात्र अजून संपलेली नाही. तसेच धुराचा अंदाज आल्यानंतर वाजणारे सायरन यंत्रणादेखील फक्त दिसायलाच आहे, मात्र ती कार्यान्वित नाही. अशाप्रकारे एवढी मोठी इमारत अग्निशमन यंत्रणेशिवाय आरोग्य विभागाने ताब्यात घेतलीच कशी? हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. भविष्यात इथे दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? ही इमारत बांधकाम करणारी सार्वजनिक बांधकाम यंत्रणा का अर्धवट काम असताना इमारत ताब्यात घेणारी आरोग्य यंत्रणा? या प्रश्नावर दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जातील.