मृताच्या बोटांचे ठसे वापरून ‘फोन पे’वरील पैसे स्वतःच्या खात्यात वळविले; जालन्यातील वाॅर्डबाॅयचे कृत्य

मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटांचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाऊण्टमध्ये वळवली. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना शासकीय कोव्हिड रुग्णालयात हा प्रकार घडला.

  जालना (Jalna) :  मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटांचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाऊण्टमध्ये वळवली. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना शासकीय कोव्हिड रुग्णालयात हा प्रकार घडला.

  वॉर्ड बॉयने मयत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरुन ‘फोन पे’ Appच्या माध्यमातून त्याच्या अकाऊण्टमधील पैसे आपल्या खात्यात वर्ग केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने याआधीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  कचरु पिंपराळे यांचे उपचारादरम्यान निधन
  जालना शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या कचरु पिंपराळे यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

  पिंपराळे यांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी त्यांच्या खात्यातून काही पैसे ट्रान्सफर झाल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केलं असता कचरु पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरुन फोनपे Appद्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचं कुटुंबीायंना समजलं.

  मृत्यू पहाटे, दुपारी पैसे ट्रान्सफर
  कचरु यांचा मृत्यू पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास झाला होता. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे कसे ट्रान्सफर झाले, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला. पिंपराळे यांचा मोबाईल रुग्णालयातच राहिल्याचं त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं.

  अंगठी-रोकडही चोरल्याचा आरोप
  कोविड रुग्णालयातील वॉर्ड बॉयने कचरु पिंपराळे यांच्या निधनानंतर अंगठ्याचा ठसा वापरून खात्यातून 6800 रुपये परस्पर लाटल्याचे पुरावे कुटुंबीयांच्या हाती लागले. पिंपराळे यांच्याजवळ असलेली 34 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची अंगठी चोरी झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.