मग् आधी ४० कि.मी.चा प्रवास करा; २६ गावांसाठी केवळ २ पोलिस कर्मचारी

जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले ठिकाण म्हणजे कुंभार पिंपळगाव. येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मागील सहा वर्ष २०१५ पासून शासन दरबारी रखडलेला आहे. कुंभार पिंपळगाव येथीस पोलीस चौकी अंतर्गत २६ गावे आहे.

     जालना (Jalna). जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले ठिकाण म्हणजे कुंभार पिंपळगाव. येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मागील सहा वर्ष २०१५ पासून शासन दरबारी रखडलेला आहे. कुंभार पिंपळगाव येथीस पोलीस चौकी अंतर्गत २६ गावे आहे. येथील कर्मचारी संख्या ६ असून सद्यस्थितीत चौकीवर फक्त दोन कर्मचारी कार्यरत आहे.

    कुंभार पिंपळगाव परिसरातील बहुतांश गावे अति संवेदनशील ओळखली जातात. परिसरातील जवळपास ५० खेडेगावाच्या व्यवहाराचा मुख्य स्त्रोत कुंभार पिंपळगाव आहे. गावात बँका, किराणा, कपडा, सोने-चांदी, कटलेरी आदी होलसेलसह शोरुममुळे व्यापारीकरण वाढत आहे. येथे भरणारा आठवडी बाजार जिल्ह्यातील मोठा जनावराचा बाजार म्हणून ओळखला जातो. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. येथे जर काही गुन्हा घडल्यास घनसावंगी येथून पोलिस फाटा बोलवावा लागतो.

    दरम्यान, परिसरातील गोदाकाठच्या गावात घटना घडल्यास फिर्याद देण्यासाठी थेट पोलिस ठाणे असलेल्या घनसावंगीला ४० किमी अंतर पार करावे लागते. तोपर्यंत घटनेचे गांभीर्य वाढण्याची किंवा त्या घटनेचा धोका वाढण्याची संभव असतो. या बाबी लक्षात घेता स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे. तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील गावे, वाड्या, वस्त्या, तांडे, चाळीस-पन्नास गावांशी संपर्क असल्यामुळे येथे पोलिस ठाणे होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुंभार पिंपळगाव येथे पोलिस ठाणे स्थापन करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.