लॉकडाऊनमुळे ‘मोळी’ विकणं आदिवासींचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन बनले

धुळे : कढईपाणी पाडा ता.शिरपूर .जि.धुळे या पाड्यावरील बहुतांश कुटुंबांतील महिला ,जंगलात जाऊन दिवसभर उन्हातान्हात फिरुन लाकूड गोळा करतात, लाकडाची मोळी तयार करुन घरी आणतात, दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता मोळी डोक्यावर घेत बोराडीकडे पायी निघतात. बोराडी गाव हे बाजारपेठचे गाव ,कढईपाणी पाड्याहून साधारणतः ७-८ कि.मी. अंतर. ५-६ महिलांचा गट डोक्यावर साधारणतः ३०-३५ किलो वजन असलेली मोळी घेऊन पायी चालत बोराडीला येतात. २-३ कि.मी .अंतर चालले की मोळी ,झाडाजवळ उभी करुन विश्रांती घेतात व पुन्हा ओझं डोक्यावर घेत चालायला लागतात.

उपाशीपोटी गावात फिरुन मोळी विकतात. हॉटेल व्यावसायिक अथवा गावातील काही कुटुंबांत ही मोळी विकतात. एका मोळीचे जेमतेम १०० रु मिळतात. या पैशांमध्ये अवघा दोन दिवस पुरेल एवढाच किराणामाल ते विकत घेऊन, उपाशीपोटी पाड्यावर परत येतात. या किराणा मालात मुख्यत: ,खाद्यतेल,साखर, चहा व मिरची एवढ्याच वस्तू थोड्या – थोड्या घेतल्या जातात. महिला मोळी विकून पैसे घरी घेऊन जात नाहीत, कारण घरी घेऊन गेले तर काहींचे नवरे ते पैसे हिसकावून घेतात व दारु पिऊन संपवतात. म्हणून मोळी विकल्याबरोबर ते पैसे या महिला किराणासाठी खर्च करतात. साधा नाश्ता देखील या महिला करत नाहीत व उपाशीपोटीच ,येऊन- जाऊन २०-२२ किमी अंतर पायीच चालतात. थुवानपाणी , गुऱ्हाडपाणी पाड्यांमध्ये राहणारे लोकही मोळी व कोळसा विकण्यासाठी अगदी २२ किमी पायी चालत,नेवली, सेंधवापर्यंत जातात.

सुभीबाई पावरा या ताईंना पाच लहान मुले. पाच लहान मुले असलेल्या ताई, भरल्या डोळ्यांनी त्यांच्या व्यथा मांडत होत्या. पोरांना पुरेसे अन्नच मिळत नाही,तर त्यांचे शिक्षण व कपडेलत्यांचा प्रश्नच नाही ,असं त्या सांगत होत्या. डोंगराळ भाग असल्याने शेतीत उत्पन्न नाही,थोडफार उत्पन्न आले असते पण जास्त पावसामुळे तेही नाही. सुभीबाई दर दिवसाआड जंगलात जाऊन मोळी तयार करुन घरी आणतात व ती विकून संपूर्ण कुटुंबांला सांभाळतात. रेशनचे तांदूळ व गहू मिळतात तेवढाच काय तो आश्वासक अन्न देणारा पर्याय. पाड्यांवरील महिलाच मोळी विकण्याचे काम करतात, पुरुष इतर काम करतात. लॉकडाऊनच्या आधी ,इतर ठिकाणी ऊस तोडणीसाठी अथवा इतर मजुरीच्या कामांसाठी हे लोक स्थलांतर करत असत. परंतु आधी लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले आहे व कोरोनाच्या भितीने या भागातील लोकांना कोणी मजुरीसाठीही बोलवत नाही. अशा परिस्थितीत सध्या काही आदिवासीं बांधवांवर उपासमारची वेळ आली आहे.

आम्ही यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाडपाणी ग्रामपंचायतीतील दहा आदिवासी पाड्यांमध्ये सध्या ,रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतोय. यातील अनेक पाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, पायवाटेने पायीच जावे लागते, थुवानपाणी सारख्या पाड्यांमध्ये तर वीजही नाही .अजूनही लोक चिमणी व कंदीलच्या सहाय्याने लोक रात्र काढतात. मनरेगाच्या माध्यमातून या लोकांना काम मिळाले तर ,यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकेल व यांना कामांसाठी स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही.

परंतु मनरेगाची माहिती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याआधी अशा मोळी विकण्याऱ्या महिलांना ,पुण्यातील काही दानशूर लोकांच्या मदतीने काल ,किराणा किटचे वाटप केले. सोबत महिलांना सँनेटरी पँडही वाटप करण्यात आले. अजूनही किमान २०० कुटुंबांपर्यंत अशा प्रकारची मदत पोहचवणे गरजेचे आहे.

यंग फाऊंडेशनची, रविंद्र, प्रकाश, जागृती, वृषभ, अभिनव, योगिता, मनिष या तरुण स्वयंसेवकांची टीम ,धुळ्यापासून १०० कि.मी.अंतरावर असलेल्या या पाड्यांमध्ये दर आठवड्याला जाऊन काम करत आहे. अजूनही आम्हांला अनेक स्वयंसेवकांची व आर्थिक सहकार्याची गरज आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर करावे.

संपर्कासाठी – संदीप विनायक देवरे, ९८२३२३५९४५