केळझर डाव्या कालव्याला गळती ; ठेकेदाराकडून वसुलीची मागणी

सटाणा : तालुक्यातील केळझर धरणाच्या नादुरुस्त डाव्या कालव्याला सोडण्यात आलेले पूरपाणी साकोडे व डांगसौंदाणे शिवारातील आदिवाशी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शासनाने चार कोटींचा निधी उपलब्द्ध करूनही ठेकदार आणि संबधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कालवा अद्याप दुरुस्त न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या कालव्याला साकोडे गावाजवळ मोठी गळती असून गेली अनेक वर्षे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे अनेकवेळा जलसंपदा विभाग अणि स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्ष झाला आहे.

या कालव्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने पुणे येथील देसाई कन्ट्रक्शन कंपनीला चार कोटींचे कंत्राट दिले आहे. ज्या ठिकाणी कालव्याला गळती आहे त्याठिकाणी कालव्याला सिमेंट पाइप टाकण्याचे हे कंत्राट असून ठेकादाराने कामात हलगर्जीपणा केल्यामुळेच हे काम बंद असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत.

ठेकेदाराकडून भरपाई वसूल करा : आ. बोरसे

आमदार दिलीप बोरसे यांनी आज तत्काळ जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांना पाचारण करून कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कालव्याच्या गळतीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. युती शासनाने चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याची निविदा होऊन वर्ष झाले तरी देखील ठेकेदाराला अद्याप काम सुरु करता आलेले नाही. संबधित ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजवावी आणि त्याच्या दुर्लक्षामुळेच आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. याला ठेकेदाराला जबाबदार धरून भरपाई वसूल करावी, अशा सूचना आमदार बोरसे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हलगर्जीपणामुळे पीक वाया गेले

पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच गेली अनेक वर्षे आमचे शेतीचे नुकसान होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रया शेतकरी वर्गातून उमटत आहेत. गेल्या रब्बी हंगामातही या कालव्याला मोठी गळती सुरू झाल्याने स्थानिक आदिवाशी शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे तक्रार केल्याने बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील जलसंपदा विभागाचे अभियांता अभिजीत रौंदळ, संजय पाटील आदींनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करीत चार महिन्यात कालवा दुरुस्ती करण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटून गेल्यावर ही काम पूर्ण न झाल्याने आज परत कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे खरीपाचा मका, कोबी, उडीद, मूग आदी पिके अक्षरशः वाया गेली आहेत. आता याची नुकसानभरपाई लवकरात लवकर करून आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती शेतकऱ्यांनी यावेळी केली.

साकोडे येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने चार महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या शब्द दिला होता काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद पडले असेल तर माहिती घेऊन पूरपाणी तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात येतील.

– जितेंद्र इंगळे पाटील, तहसिलदार

कालव्यातून पाण्याची ठिठिकाणी होत असलेली गळती कमी करण्यासाठी प्लास्टिक कागदचे आच्छादन करण्यात आले आहे व जेसीबीच्या साह्याने कालव्यतील अडथले दूर करण्यात येत आहेत. कोरोनामुळे काम थांबले असून लवकरच काम हाती घेण्यात येईल.

– अभिजीत रौंदळ, अभियंता जलसंपदा विभाग